पान:निखळलेलं मोरपीस.pdf/१२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 तेवढ्यात मोठ्यानं आरडाओरडा झाला. सहा फूट उंचीचा आणि तेवढ्याच आडव्या देहाचा विशालकाय तनेजा जोरात ओरडून पडला होता. जिन्याच्या पायरीवरच तो आडवा झाला होता. आता निपचित पडला होता. हार्ट पेशंट असल्याने काळजी होती. कुणी कुणी जवळचे सिगारेट लाईटर्स पेटवले. कुणी काडेपेट्यांच्या काड्या ओढल्या. तनेजाला दरदरून घाम आला होता. कुणी तरी जवळच्या मजल्यावर पाणी आणायला गेला.

  सगळा ट्रॅफिक खोळंबला होता. खंडाळ्याच्या घाटात अडकावा तसा. एरवी डिपार्टमेंटमध्ये तनेजाला सर्वजण सहानुभूती दाखवत. पण आता सगळे शिव्या घालायला लागले. एवढा हार्ट ट्रबल आहे तर कशाला नोकरीसाठी कलमडतो? बायको नोकरी करते, मुलं मिळवती झालीत. उगाच ऑफिसला कटकट! मग एकजण म्हणाला, ‘बँकेची रिएम्बर्समेंट मिळते ना? याच्या सगळ्या बिलांची बँकेवर जबाबदारी! आजाराच्या नावाखाली लाईट डेस्क पाहिजे. लवकर घरी जायला पाहिजे."

 प्रत्येक क्षण न् क्षण युगासारखा भासत होता. कोणत्या क्षणी बँकेत ठेवलेला बॉम्ब फुटेल आणि आपल्या चिंधड्या उडतील ते सांगता येत नव्हतं. मृत्यू क्षणाक्षणाला पुढे सरकत होता. दुरून कुठूनतरी अस्फूट किंकाळ्या ऐकू येत होत्या. नेहमीच अभद्र बोलणारा गोडबोल्या म्हणाला की, बहुतेक लिफ्टमध्ये अडकलेली माणसं "सोडवा सोडवा’' म्हणून ओरडत असावीत. शक्यता नाकारता येत नव्हती. सर्वांच्या अंगावर एकदम शहरे आले! बाप रे, बंद लिफ्टमध्ये गुदमरून मरायचे? पूर्वीच्या लोखंडी लिफ्टस् बऱ्या होत्या. निदान थोडी तरी हवा खेळायची? या नव्या लिफ्टस् म्हणजे मोठे मोठे व्हॉल्टस्च. आत अडकलेल्या लोकांचे काय झाले असेल कुणास ठाऊक? कशाला एवढ्या अजस्त्र, उंच बिल्डिंग्स् बांधतात कुणास ठाऊक? रश्मी वैद्यनाथनने मनोमन देवाचे आभार मानले. लिफ्टमध्ये घुसायला मिळाले नाही म्हणून!

 पाण्याचे सपकारे मारून तनेजाला जागे करण्यात आलं. त्याच्या दोन्ही बगलेत आधार देऊन सावकाश सावकाश 'अंधार यात्रा' पुन्हा सुटकेच्या आशेने सरकू लागली!

 मगाशी जरा भरभर तरी जाता येत होतं. आता या तनेजाच्या 'लायबिलीटी' मुळे प्रगती मंद होत होती. पण मोठ्यानं कुरकुरता पण येत नव्हतं. पंचविसाव्या मजल्यावरची इना रेबेलो धावत आली होती. तनेजा आता तिच्या 'केअर' मध्ये होता. इनाला सर्वजण मदर तेरेसा असंच म्हणत. कुणाच्याही, अगदी जात-भेद विसरून मदतीला धावून जाण्यातच तिला आपल्या जन्माचे सार्थक वाटत असे.

 अंधाऱ्या रस्त्याने-जिन्यामुळे आपण कुठल्या मजल्यापर्यंत खाली उतरलो तेच कळत नव्हतं. जिन्यात पाय अडकायचे. पायरी चुकून घसरायला व्हायचं. पण एकमेकांना

निखळलेलं मोरपीस / १२५