पान:निखळलेलं मोरपीस.pdf/१२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

चोवीस मजल्यावरून आधीच भरून आलेल्या लिफ्टमध्ये सर्वजण शिरायला बघत होते. आतले लोक बाहेरून आत येणाऱ्यांना हुसकवत होते. लिफ्टमध्ये असलेल्या पुरुषांनी बाहेर यावं आणि लेडीजना आत घ्यावं म्हणून बाचाबाची सुरू होती. राणे पोचले तेव्हा चक्क मारामारीच सुरू झाली. राण्यांना नवल वाटले. रिझर्व्ह बँकेसारख्या प्रतिष्ठित ऑफिसची ही उच्चभ्रू माणसं ? अशी कशी बेशिस्त वागत आहेत? शेवटी आपला जीव तेवढा प्यारा. सगळीकडेच हा प्रकार. मिलिटरीमधून आलेल्या राणेसाहेबांना ही गैरशिस्त कशी सहन व्हावी? ते लिफ्टसमोरच्या कॉरिडॉरमधील गर्दीला हटवण्यासाठी पुढे निघाले. एवढ्यात.....

 तेवढ्यात सगळे लाईट गेले. कॉरिडारमध्ये अंधार पसरला. लांबून कुठून तरी बॉम्बस्फोटाचे आवाज घुमले.

 सगळीकडे पळापळ सुरू झाली. कोणी ओरडलं, 'आपल्या बँकेत बॉम्ब ठेवलाय, पळा, दौडो.’ एकमेकांना तुडवत, ढकलत, सर्वजण पळायला लागले. पण पळायचं कसं? लिफ्ट तर बंद पडलेली. आता वीस मजले उतरुन खाली जायचं? नुसत्या कल्पनेनंच सगळ्यांच्या पायात पेटके आले! पण दुसरा इलाज काय? लाईट येईपर्यंत वाट बघायची? लाईट आल्यावर लिफ्टस् सुरू होणार? मग बँकेचे इमर्जन्सी लाईटचे काय? ते तरी केव्हा येणार? जनरेटर केव्हा सुरू होणार? आणि तेवढ्यात बॉम्बस्फोट झाला तर? कोणी ओरडत होतं की एके-४७ घेऊन बँकेत अतिरेकी शिरलेत. आपली बँक म्हणजे देशाची बँक. अतिरेक्यांच्या 'हिट' लिस्टवर आहे. म्हणजे नक्कीच बॉम्ब बँकेत पेरलेले असणार? सगळ्यांची कुजबुज वाढायला लागली. आता लिफ्टची वाट बघण्यात काही अर्थ नाही. काय होईल ते होईल. आता सुरक्षितपणे बाहेर पडायचं म्हणजे सरळ वीस जिने उतरून खाली जाणे.

 सगळे जिन्यापाशी आले. एव्हाना पंचवीसाव्या मजल्यावरून येणाऱ्या स्टाफच्या लोकांची जिन्यात गर्दी झाली होती. जिन्यावरून वळताना जो मध्यभागी झरोका होता त्यातून बाहेरचा उजेड दिसायचा. पण परत वळलं की पायऱ्यावरून अंधारच अंधार. घारपुरे मॅडमनी आज वाढदिवस म्हणून सासूच्या नाकावर टिच्चून घसघशीत सोन्याचे तोडे केले होते. ते त्यांनी घातले होते. सहा वाजता नवरा येणार होता. दोघं मिळून मेट्रोच्या सिनेमाला जाणार होते. नंतर बाहेरच जेवणार होते. आता कसलं काय नि काय? नवरा सेंट्रल बँकेत कुलाब्याला होता. तिकडे काय परिस्थिती आहे देव जाणे? ह्या पुरुषांना वाट्टेल ते बोलायला काहीच कसं वाटत नाही? म्हणे, कुलाबा, नरीमन पॉईंटला दोन बसेस स्फोटात उडाल्या. त्यातली माणसं फुटबॉलसारखी आकाशात उडाली!

अंधारयात्रा / १२४