पान:निखळलेलं मोरपीस.pdf/१२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

जाळपोळ, लुटालूट, दंगली चालू असण्याची शक्यता आहे. वातावरण निवळेपर्यंत सर्वांची ऑफिसात रहाण्या-जेवण्याची सोय होईल. गुड लक्."

 सर्वजण लिफ्टकडे धावले. प्रत्येक मजल्यावर सहा लिफ्टस् होत्या. एकूण पंचवीस मजले. केव्हा नंबर लागेल कुणास ठाऊक?

 सगळे हलले तरी आर. ए. एम. मोडक हलला नाही. गलितगात्र होऊन खुर्चीतच बसला. सगळा फ्लोअर व्हेकेट करण्याची जबाबदारी मार्शल या नात्याने राणेसाहेबांवर होती. ते त्याच्याजवळ गेले. त्यांनी त्याच्या खांद्यावर थोपटलं. मोडक लहान मुलासारखा ओक्साबोक्सी रडू लागला. "राणे, मला फार भीती वाटते हो?"

 “कसली रे?" राण्यांनी आश्वासक स्वरात विचारलं.

 "चिंचपोकळीच्या पुलाखाली मागच्यासारखा 'प्रकार' असला तर?”

 राण्यांच्या डोक्यात एकदम प्रकाश पडला! त्या मोडकला, त्याच्या आद्याक्षरांवरुन सर्वजण 'राम' मोडक म्हणत! पण त्याचं खरं नाव होतं रफिक अहमद महमद मोडक आर.ए.एम्. मोडक. कोकणात जन्मलेला हा मुसलमान दिसायचा थेट चित्पावन ब्राम्हणासारखा! तीन महिन्यांपूर्वी बाबरी मशीदीवरून दंगल सुरु झाली तेव्हा चिंचपोकळी ब्रिजजवळ असलेल्या आपल्या घराकडे तो जात होता. ब्रिजच्या तोंडाशी माथेफिरूंचे एक टोळके होते. हिंदू आहेस का मुसलमान ह्याची खातरजमा करुनच त्या त्या माणसाला ट्रॅफिकमधून 'क्लिअर' करीत. कोकणस्थ ब्राम्हण दिसणारा मोडक त्या 'वेढ्या'तून सुटत होता तेवढ्यात कोणीतरी ओरडलं 'अरे तो xxx लांडा आहे.” मोडक थरथरत होता. त्याच्या तोंडातून शब्द फुटत नव्हता. मग कुणीतरी ओरडलं. "पँट सोडा साल्याची.” मोडकनं खूप गयावया केली. पण पुढच्या 'विटंबने'तून त्याची सुटका झाली नाही. त्याची 'रितसर' तपासणी झाल्यावर त्याच्यावर लाथा बुक्क्यांचा वर्षाव सुरू झाला. तेवढ्यात पोलिसांच्या सायरन गाडीचा आवाज आला. सगळे पसार झाले. बलात्कार झालेल्या स्त्री-सारखा कपडे सावरत मोडक उठला. पोलिसांनी त्याला घरी पोहोचवले. पण त्यानंतर 'शॉकने' महिनाभर तो घरी निजून होता. आत्ताआत्ता धीर धरून तो ऑफिसला यायला लागला होता. पुन्हा मागचा 'प्रकार' होईल म्हणून थरथरत होता.

 राणेंनी त्याला थोपटून धीर दिला. म्हणाले,

 "आपल्याला बिल्डिंग खाली करायचा हुकूम आहे. तू समोरच्या रिक्रिएशन हॉलमध्येच रहा. घरी जाऊ नकोस. आपण काही तरी व्यवस्था करू." त्याला घेऊन राणे लिफ्टकडे आले. सहांपैकी फक्त एक लिफ्ट आली आणि थांबली. वरच्या तेवीस,

निखळलेलं मोरपीस / १२३