पान:निखळलेलं मोरपीस.pdf/१२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 फाटक पिसाळून काही तरी बोलणार तेवढ्यात जोशीने त्याला शांत केलं. ढवळेला बाजूला नेलं. फाटकला सर्वजण 'अतिरेकी अडवानी' म्हणत, तर जोशीला 'सौम्य प्रकृती वाजपेयी' समजत.

 नेहमीसारखी वादळी चर्चा सुरु होणार, एवढ्यात....

 ऑफिसच्या माईकचा आवाज आला.

 “हॅलोऽऽ, हॅलोऽऽ, युवर अटेंशन प्लीऽऽज"

 सगळीकडे शांतता पसरली. श्रद्धांजलीला उभं राहावं तसे सगळे जिथल्या तिथेच थबकून उभे राहिले.

 "हॅलोऽऽ, हॅलो, यू आर रिक्वेस्टेड टू व्हेकेट दी प्रिमायसेस इम्मिजिओटली. इन्सिडनसेस ऑफ बॉम्ब एक्सप्लोअर्स आर रिपोर्टेड इन दी सिटी. डोण्ट टेक एनिथिंग विथ यू. व्हेकेट इम्मिजिओटली अॅज पर डायरेक्शन्स ऑफ युवर फ्लोअर मार्शल. " ऑफिसच्या २५ मजल्यांवरून एकाच वेळी अनौन्समेंट झाली.

 रेचेल रडायला लागली. तिची दोन्ही मुलं कुलाब्याच्या सेंट्रल स्कूलमध्ये होती. लंब्या घारपुरे चरफडत केसकरला म्हणाला, "साला वैताग आहे वैताग. बाबरी मशिदीपासून पोराचं डोकं आऊट झालं होतं. आमचं डोंबिवली म्हणजे नेपाळनंतरचं दुसरं हिंदुराष्ट्र ना? अयोध्येत कोवळी कोवळी पोरं मेली. मुंबईच्या सहा डिसेंबरच्या दंगलीत 'आमचे' लोक मेले; म्हणून 'त्यांचे' लोक मारायला बाहेर पडले. त्याच्या पाया पडून समजावलं. परीक्षा तोंडावर आल्यात. आता कुठं शांत झाला होता. पुन्हा दंगली सुरू झाल्या म्हणजे बघायला नको."

 केसकरला माहीत होतं. घारपुरेच्या मुलाला दहावीला नव्वद टक्के मार्कस् होते. या बारावीच्या परीक्षेवर त्याची इंजिनिअरींगची अॅडमिशन् अवलंबून होती. मुलगा या हिंदू-मुसलमान दंगलीत पुन्हा बिथरला तर नक्कीच आयुष्याचे मातेरे!

 तेवढ्यात त्यांच्या विसाव्या मजल्याचे मार्शल राणेसाहेब आले. ते तिथल्याच एका टेबलावर उभे राहिले. हातांनी खुणा करुन त्यांनी सर्व स्टाफला आपल्याजवळ बोलावले. म्हणाले, “शहरात एकापाठोपाठ बॉम्बस्फोट चालू आहेत. आपल्यापैकी लेडीज् लिफ्टने आधी खाली जातील. त्यांच्याबरोबर तनेजा आणि सोनावणे जातील."

 त्या दोघांची नुकतीच अँजिओप्लास्टी झाल्याचं सर्वाना माहीत होतंच. राणेसाहेब पुढे म्हणाले “लिफ्टने खाली उतरल्यावर सरळ घरी जा. वाटेत कुठल्याही अनोळखी वस्तूला हात लावू नका. गाड्या बंद पडणे, बसेस बंद पडणे असे प्रकार होऊन घरी पोचणं अशक्य झाल्यास इथं परत या. ऑफिसमध्ये रहाण्याची सोय करण्यात येईल. शहरात

अंधारयात्रा / १२२