पान:निखळलेलं मोरपीस.pdf/१२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१८. अंधारयात्रा


 डिसूझाचं डिक्टेशन संपलं तेव्हा सुषमानं केबिनच्या काचेतून टॉवरच्या घड्याळाकडे बघितलं. दोन वाजले होते.

 तेवढ्यात मोट्टा आवाज आला. धडाड्ऽऽधुम. धडाड्धुमऽऽ.

 सगळ्या डिपार्टमेंटमध्ये गोंधळ उडाला. पुन्हा आवाज आले. भराभर काचेची केबिन उघडून बघितले तेव्हा चक्रवर्ती मोठ्यानं ओरडला. "ओऽऽऽ माय गुडनेस. फायर. सी द फायर."

 त्याच्या बाजूच्या सगळ्या खिडक्या उघडण्यात आल्या. आख्खं डिपार्टमेंट तिथं गोळा झालं. परिचित स्टॉक एक्सचेंजची बिल्डिंग आगीच्या ज्वाळांनी लपेटलेली होती. तेवढ्यांत डिसोझा ओरडला, "सी देअर."

 बापरे, एअर इंडियाची बिल्डिंग, नरीमन पॉइंटच्या काही बिल्डिंगस्ना आगी लागल्या होत्या. त्या बाजूला सर्व काळेकुट्ट वातावरण दिसत होतं. आकाशात उंचपर्यंत काळा धूर पसरलेला होता. त्या दरम्यान दिसणारी एक छोटीशी सहा मजली बिल्डिंग, लाकडाच्या सरणावर ज्वाळांनी लपेटलेली सती शांतपणे बसलेली दिसावी, तशी दिसत होती.

 रस्त्यांवरुन मोठा गलका ऐकू येत होता. फायर फायटरचे बंब, पोलिसांच्या गाड्या धावत होत्या. सायरनचे आवाज वर विसाव्या मजल्यावरसुद्धा स्पष्ट ऐकू येत होते. लोक सैरावैरा धावत होते.

 विष्णू पाटकर डिपार्टमेंटमध्ये धावत आला. धापा टाकत म्हणाला, “बॉम्बे पेटलीय दोस्तानू. सगळीकडे बॉम्ब फुटतायत. शेअर मार्केटची बिल्डिंग पार उडालीय. एअर इंडिया बिल्डिंगच्या तळाशी चार स्फोट झालेत. बँक ऑफ ओमानची अख्खी मंडळी टेबल-खुर्चीसकट आकाशात उडालीत."

 "बाऽऽ परेऽऽऽ बाप, म्हणजे पुन्हा हिंदु-मुसलमान दंगली पेटलेल्या दिसतात."

 "फाटक, ही तुमची रथयात्रा बरं. बाबरी मशीद फोडलीत ना? मोठा पराक्रम केलात. आता आम्ही भोगतो त्याची फळं." काँग्रेसवाला पोट्या ढवळे गुरगुरला.

निखळलेलं मोरपीस / १२१