पान:निखळलेलं मोरपीस.pdf/१२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 "टिकमसाहेब, तुम्ही त्यादिवशी अगदी देवासारखे भेटलात असं म्हटलंय त्यांनी."

 "म्हणजे?

 “म्हणजे झालं होतं असं की माझी आई अचानक सीरीअस झाली म्हणून मी आबांकडे निघून आले. त्याच एक दोन दिवसात बऱ्याच घडामोडी झाल्या. कुठंतरी स्फोटकं उतरावयाची होती. खबर पक्की होती. कस्टमची शोध-पथकं मागावर जायची होती. पण कुठून कळ फिरली कुणास ठाऊक? ते 'ऑपरेशन' च रद्द झाले. त्या विषयावरुन वरिष्ठांबरोबर यांची बरीच बाचाबाची झाली. रात्री घरी आल्यावर डायरीत त्यांनी बऱ्याच गुप्त गोष्टींच्या नोंदी केल्या. स्मगलर्सना सामील असणाऱ्यांची नावे त्यात होती. डिपार्टमेंटचे लोकच जाणूनबुजून सरकारची आणि लोकांची कशी दिशाभूल करत आहेत ह्याच्या त्यात नोंदी होत्या. काही जागांचे नकाशे होते."

 "मग हे सगळं माझ्याकडं द्यायचं कसं काय डोक्यात आलं?"

 "तुम्ही भेटलात त्याच दिवशी दुसरीकडे त्यांची 'ड्युटी' लागल्याचे त्याना सांगण्यात आलं. आठ-दहा दिवस कुठं तरी ड्युटीवर दुसऱ्या दिवसापासूनच जायचं होतं. वरिष्ठांशी झालेल्या भांडणामुळे आपल्यावर काहीतरी संकटे आणली जातील अशी त्याना शंका होती. मात्र जीवावरचे संकट आणतील असं मात्र त्याना वाटलं नसावं. कुठं तरी अडचणीच्या दूर ठिकाणी पाठवतील, असं वाटलं होतं. मी घरात नाही. दुसरे दिवसापासून कुठल्या जागी 'ड्युटी' लागेल याची कल्पना नाही. तेव्हा मी येईपर्यंत फाईल कुणाकडं तरी सुरक्षित रहावी हा त्यांचा हेतू होता. बरं, ऑफिसच्या लोकांमध्ये किंवा गावामधील लोकांमध्ये एवढा विश्वास टाकावा असं कोणी त्याना दिसेना. शिवाय त्यांनी फाजील चौकशा केल्या असत्या. म्हणून अगदी देवासारखे तुम्ही भेटलात असं त्यानी म्हटलंय."

 "पण मला त्याची काहीच कल्पना दिली नाही."

 "देणार होते. पण एक तर त्यांच्या पाळतीवर कोणीतरी असेल अशी त्याना शंका होती; म्हणून त्यानी तुमच्याशी जास्ती बोलण्याचं टाळलं. त्यातून तुम्ही पण फारशी चौकशी केली नाहीत. दुसरं म्हणजे आपण लौकरच मुंबईला वरिष्ठ ऑफिसर्सना फाईल घेऊन भेटायला जाऊ तेव्हा सगळं तुम्हाला सांगायचं त्यानी ठरविलं होतंच; पण घडलं ते भलतंच."

 बोलता बोलता जगनच्या बायकोला रडू फुटलं. ती मुसमुसून रडू लागली. बायको तिला आत घेऊन आली.

निखळलेलं मोरपीस / ११९