पान:निखळलेलं मोरपीस.pdf/११९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 मुलगी आश्चर्यचकित झाली. कधी न ओरडणारी आई! भांबावलेले बाबा! मग ती म्हणाली,

 "अगं, असं काय करतेस? बाबांनी मागं पासपोर्टसाठी अर्ज केला होता ना? त्या संदर्भात बोलावलंय."

 माझ्या मनावरचे ओझे उतरले. उगाचच काल्पनिक भीतीचे किती बागुलबुवे आपण स्वत: समोर उभे करत असतो.

 पोलिसांच्या माहितीसाठी किहिमला गेल्या दिवसापासून ते जगनच्या भेटीपर्यंतचा, नंतरच्या मन:स्थितीचा, त्याच्या शोधासाठी केलेल्या प्रयत्नांचा वगैरे सर्व वृत्तांताचे ब्रीफ मी तयार केले. पोलिसांसमोर उभं राहून निर्भय मनाने सर्व काही सांगायचे असं ठरवून मी शांत मनाने झोपी गेलो .

∗∗∗

 पण पोलिसांकडे जाण्याची वेळ माझ्यावर आलीच नाही! दुसऱ्या दिवशी सकाळीच दारावरची बेल वाजली. दारात जगनची बायको आणि एक पोलिसी खाक्याचे, करड्या चेहऱ्याचे गृहस्थ. मी मनातल्या मनात चरकलो. म्हटलं आता आणखी कुठली भानगड निघतीय कुणास ठाऊक? जगनच्या बायकोला माझी बायको प्रत्यक्ष ओळखत नव्हती. बरोबरचे गृहस्थ तिचे वडिल असल्याचे कळल्यावर माझा जीव भांड्यात पडला. तिच्या वडिलानी जगनची सगळी हकीगत सांगितली. मी भेटलो त्याच्या तिसऱ्या दिवशीच जगनचा मृत्यू ओढवला होता. वरकरणी स्मगलर्सबरोबर झालेल्या चकमकीतील मृत्यू अशी नोंद असली तरी काही हितसंबंधी लोकांनी जाणूनबुजून घडवून आणलेली ती हत्याच होती. नात्यागोत्यातील सर्वांची आणि जगनला ओळखणाऱ्या सर्वांची तशी खात्री होती. सर्व हकीगत सांगणे चालू असतानाच जगनची बायको रडत होती. माझी बायको तिच्या पाठीवरून हात फिरवत होती. मध्येच ती उठून आत गेली आणि कॉफी घेऊन आली. मी अजून ब्रीफकेसविषयी एकहि शब्द उच्चारला नव्हता. त्यांना ही ब्रीफकेसची गोष्ट माहीत आहे का नाही? कल्पना नव्हती. पण असणारच. नाही तर एरवी ही मंडळी माझ्याकडं कशाला येतील?

 कॉफी पिऊन झाल्यावर जगनची बायको पुष्कळच सावरली होती. तिने आपल्या पर्समधून एक छोटीशी काळी डायरी काढली. ज्या दिवशी किहिमच्या किनाऱ्यावर आमचा गाण्याचा कार्यक्रम झाला त्याच दिवसाची जगनच्या हस्ताक्षरातील नोंद तिने आम्हाला दाखवली. माझ्या अनपेक्षित भेटीचा त्यात उल्लेख होता. ती म्हणाली,

बॉम्बस्फोट / ११८