पान:निखळलेलं मोरपीस.pdf/११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२. सिद्धार्थ आणि गौतम

 सकाळीच रमाकांत सांगून गेला.

 'आज रात्री पार्टी आहे. लक्षात आहे ना? मी बरोबर रात्री आठ वाजता न्यायला येतो.”

 पार्टी भिकूशेठच्या बंगल्यावर होती. भिकूशेठवर एक परिचयपर लेख मी लिहिला होता. त्याच्या एकसष्टीच्या निमित्ताने. सर्व वृत्तपत्रांनी फोटोसह त्या लेखाला प्रसिद्धी दिली होती. भिकूशेठला अभिनंदनाचे फोनवर फोन येत होते. त्याच्या कर्तृत्वाचा आलेख सुरेख शब्दात मी काढून दिला होता. त्याच्या अंगी असलेले (आणि खरं म्हणजे नसलेले!) सर्व गुण मी 'मॅग्निफाय' करून सजविले होते. खरं म्हणजे हे सगळे विचित्र होते. त्याच्यासारख्या गुंड आणि छुप्या स्मगलरवर मी अशी स्तुतीपर लेखणी चालवायला नको होती. पण रमाकांत माझा फार जुना वर्गमित्र. त्याने नवीनच मोठी जाहिरात संस्था काढली होती. या साऱ्या बड्या बड्या धेंडांच्या जाहिराती त्याला मिळवायच्या होत्या. मी त्याला म्हटलं, "रमाकांत, असल्या माणसांवर काय लिहायचं? लिहिण्यासारखं आहेच काय?"

 तेव्हा रमाकांत हसून म्हणाला,

 "मग काय तू त्या तात्या मास्तरवर लिहिणार? कोणी छापेल ते?"

 त्याचं म्हणणं खरं होतं. तात्यांसारखा चारित्र्यवान, सत्शील माणूस, तुरुंगात ब्रिटिशांच्या लाथा खाऊनहि ताठ मानेने उभा राहणारा माणूस, आता समाजाच्या कोणत्या कोपऱ्यात जाऊन पडला होता? त्यांचा त्याग, कर्तृत्व, सध्या ते चालवत असलेला आश्रम या साऱ्या गोष्टींवर मी तळमळून लिहिलं, पण कोणी ते छापायलाच तयार नव्हतं. समाजाची दुःखं वेशीवर टांगण्यासाठी लिहिलेल्या माझ्या आदर्शवादी कथा आणि कविता सगळीकडून 'साभार' परत येऊन कपाटात धूळ खात पडल्या होत्या आणि भिकूशेठच्या लेखासाठी मला तीनशे रुपये मोबदला म्हणून मिळणार होते. "काय? तीनशे रुपये?" असं मी आश्चर्याने त्यावेळी जवळजवळ ओरडलोच होतो. तेव्हा रमाकांत म्हणाला, 'लिहून बघ तर खरं.'  

सिद्धार्थ आणि गौतम / १०