पान:निखळलेलं मोरपीस.pdf/११८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 इकडे तिकडे पाहून तो हळू आवाजात म्हणाला, "म्हणजे त्याला आपल्याच लोकांनी मारला असं म्हणतात. "

 " अरे देवा, पण असं का म्हणून?

 "ते काय तू विचारु नकोस बाबा. त्यांचे काय काय हितसंबंध असतात देव जाणे."

 "जगनची बायकामुलं कुठे असतात?"

 "ती महाडलाच वडिलांकडे महिनाभर होती. जगन गेल्यावर इकडे तिला आणली होती. त्यावेळी डिपार्टमेंटवाल्यांना खूप शिव्या घालत होती."

 "त्यांचा महाडचा पत्ता आहे का ? तिला भेटायला हवं."

 "नाही. माझ्याकडं पत्ता नाही."

 मग थोड्या वेळाने गप्पा संपल्या. मी दुसऱ्याच दिवशी मुंबईला परतलो.

∗∗∗


 बायकोला सगळी हकीगत सांगितली; अर्थात मुलांच्या नकळत. ती पण चक्रावली. परिस्थिती चांगलीच बिकट बनली होती. आता जगनच या जगात उरला नाही तर या ब्रीफकेसचं करायचं तरी काय? गुंता वाढतच चालला होता. नसतं लचांड मागं लागलं होतं. शेवटी धाडस करुन सरळ पोलीसात जाऊन सगळी हकीगत सांगावी अशा निर्णयाप्रत आम्ही दोघं आलो. अनोळखी वस्तू-बॅगा, ब्रीफकेसेस् कशाहि वस्तूना ह लावू नका म्हणून पोलीस यंत्रणा टाहो फोडून सांगत होती. आणि आम्ही मात्र एक अनोळखी बॅग घरात ठेवून सरकारला धोका देत होतो. आता पोलिसाना सांगायचंच; त्यातून जी काही खटली अभी राहतील, प्रश्नांची सरबत्ती होईल त्याला तोंड द्यायलाच हवं.

 रात्री जेवता जेवता मुलगी म्हणाली.

 “बाबा, काल संध्याकाळी एक पोलीस आला होता. तुम्हाला पोलीस स्टेशनवर येऊन जायला सांगितलंय."

 अरे बापरे, मी एकदम उडालोच. संपलं आता सगळं. पोलिसयंत्रणेला सगळा 'सुगावा' लागलेला दिसतोय. मी पाण्याचा घोट घेतला. बायको ओरडली,

 "अगं मी कुठं होते? मला का नाही सांगितलंस? कशासाठी बोलावलं आहे? का बोलावलं आहे? सगळं विचारायचंस तरी."

निखळलेल मोरपीस / ११७