पान:निखळलेलं मोरपीस.pdf/११७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 मी दुसऱ्याच दिवशी अलिबागला गेलो. एका वर्गमित्राकडे उतरलो. किहिमला जाण्यास काहीतरी सबळ कारण हवं होतं. जगनचा पत्ता माहीत नव्हता. जास्तीत जास्त सरपंच वा अन्य कुणाकडं मी चौकशी करणार होतो. जागोजागी पोलीस चौक्या होत्या. गस्तीपहारे होते. गस्ती पथके हिंडत होती. अशा स्थितीत किहिमला काय किंवा अलिबागच्या कस्टमच्या ऑफिसमध्ये काय एखाद्या कस्टम ऑफिसरची चौकशी करणे म्हणजे आपणहून पोलीस चौकशीच्या फासात स्वत:ची मान अडकून घेण्यासारखंच होतं. भयानक बनलेल्या सद्य:स्थितीत निष्कारण तोहमत ओढवून घेणारं होतं. घरी, दारी, ऑफिसात बाजारात सर्वत्र प्रत्येकजण दुसऱ्याकडे संशयानं पहात होता. हा माणूस 'आपला' आहे का 'त्यांचा' आहे या एका संशयरेषेभोवतीच सगळी माणसं घोटाळत होती. मी आता जगनचा शोध घ्यायचा तरी कसा याबद्दल मनाशी उलटसुलट विचार करुन पहात होतो.

 आणि अगदी अनपेक्षितपणे मला उत्तर मिळालं!.

 मित्राकडे रात्री गप्पा मारत असताना आमचा एक जुना वर्गमित्र आला. गप्पांचा विषय अर्थातच् मुंबईचा बॉम्बस्फोट, अयोद्धेच्या बाबरी मशिदीच्या पाडावानंतर उसळलेल्या हिंदू-मुसलमान दंगली, समुद्रमार्गाने येणारी स्फोटके अशा ज्वलंत गोष्टींचा होता. आपल्या रायगड जिल्ह्याचे नाव बदनाम झाले, स्मगलरांच्या, देशद्रोही अतिरेक्यांच्या कारवायांचे नंदनवन असं रायगड जिल्ह्याचं वर्णन होतं म्हणून आमचा वर्गमित्र व्यथित झाला होता; पोलीस-कस्टम यंत्रणेतील भ्रष्टाचाराबाबत अत्यंत कडवटपणे बोलत होता. स्मगलिंग दादांबरोबर असलेल्या त्यांच्या साट्या - लोट्यांच्या रसभरीत हकीगती सांगत होता. मी चटकन् काही तरी आठवल्यासारखं करुन जगनचा विषय काढला. तेव्हा तो म्हणाला,

 "म्हणजे, जगनविषयी तुला काही कळलं नाही?"

 “नाही.” आता हा काय सांगतोय ह्या भीतीने माझ्या पोटात गोळा उठला ! कुठं तरी जगन अडकलेला असला तर पोलीस चौकशीचे लोण माझ्यापर्यंत यायचं. मी चेहरा शक्य तितका निर्विकार ठेवण्याचा प्रयत्न करीत त्याच्याकडे प्रश्नार्थक मुद्रेने पहात राहिलो.

 "अरे, तो आठ-दहा दिवसांपूर्वीच मेला."

 "म्हणजे?" मी किहिमच्या भेटीविषयी बोलायचंच टाळलं.

 "स्मगलर्सच्या टोळीबरोबर चकमक झाली. त्यात तो मारला गेला."

 " अरे बापरे!"

 "आणि खरं सांगायचं तर...."

बॉम्बस्फोट / ११६