पान:निखळलेलं मोरपीस.pdf/११६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

त्यात काही स्फोटक द्रव्यं असली तर? त्यांचा स्फोट झाला तर? छी थू होईल. नामुष्की होईल. खरं म्हणजे प्राणांवरच बेतेल! नामुष्की बघायला जिवंत कोण राहातंय? बरं ती ब्रीफकेस सांकेतिक पद्धतीच्या कुलुपाने बंद होती. आपल्या किल्ल्या लावून बघणं धोक्याचं. मार्केटमध्ये जाऊन किल्लीवाला गाठायचा, डुप्लिकेट किल्ली शोधायची म्हणजे आजच्या वातावरणात संकटालाच आमंत्रण! अशा अनेक शंकाकुशंकांच्या इंगळ्या मनाला डसू लागल्या. मन तर इतके भयभीत झाले की ब्रीफकेस ठेवलेल्या कपाटाकडे बघवेना! एरवी मी धडाधड कपाट उघडायचा. पण आता जवळ जायची पण भीती वाटायला लागली!

 दुसरे दिवशी बायकोच्या सांगण्याप्रमाणे ऑफिसला सिक नोट पाठवून दिली. मुलं बाहेर गेल्यावर बायको म्हणाली,

 "आता आपण एक धाडस करायचं."

 "काय?"

 "ती ब्रीफकेस कपाटातून काढून आपण माळ्यावर ठेवून देऊ. मुलांना विश्वासात घेऊन काही सांगता येत नाही."

 "अगं पण माळावर ठेवताना काही झालं तर? त्यापेक्षा....."

 "हे बघा, तुम्ही आता काही विचार करु नका. तुम्ही फक्त स्टूल धरा."

 मग हलकेच कपाट उघडून काहीशा द्दढनिश्चयाने तिने एका जुन्या शालीत ब्रीफकेस गुंडाळली. स्टुलावरुन माळावर चढली आणि आमच्या पाण्याच्या सिमेंटच्या टाकीवर ती ब्रीफकेस ठेवली. एक जुनी मोठी जाडजूड पत्र्याची एक रिकामी ट्रंक आमच्याकडे होती. तिला झाकण नव्हतं. ती ट्रंक उलटी करून तिनं ब्रीफकेसवर ठेवून दिली. म्हणजे उंदरांनी कुरतडायची भीती नको.

 एवढं 'ऑपरेशन' यशस्वीपणं झालं. मी चहा बनविला. चहा घेता घेता बायको म्हणाली.{paragraph break}} "तुम्ही आता एक काम करायचं."

 "कोणतं?"

 "आता तुमच्या त्या जगनच्या येण्याची आशा सोडून द्या. तुम्हीच अलिबाग- किहिमला जा आणि त्याचा शोध घ्या. मात्र अत्यंत सावधपणे. कस्टमच्या माणसाची विचारपूस करणंसुद्धा सध्या किती धोक्याचं आहे याचं पुरेपूर भान असू द्या. रजा वाढवावी लागली तरी चालेल. पण हे काम पुरं करुनच या."

निखळलेलं मोरपीस / ११५