पान:निखळलेलं मोरपीस.pdf/११५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पकडले आहेत ते वाचताय ना? त्या जगननं कसली ब्रीफकेस दिली आहे?"

 ब्रीफकेसची आठवण झाल्यावर मला एकदम दरदरून घाम फुटला! म्हणजे त्यात काही काळंबेरं तर नसेल ना?

 "तो जगन केव्हा येतो म्हणाला होता?"

 "येईन पुढच्या सात आठ दिवसात असं म्हणाला होता."

 “मग आता किहिमहून तुम्ही परत आलात त्यालाच दहा दिवस झाले. अजून त्याचा पत्ता नाही."

 माझ्याकडे काही उत्तर नव्हतं.

 "तुमचा नेहमीचाच बावळटपणा नडतो. पटकन मागचापुढचा विचार न करता कोणावरहि विश्वास ठेवता. आणि नसती ब्याद मागे लावून घेता. आता सांगा त्या काळ्या बॅगेत सोन्याची बिस्किटं आहेत, नोटांच्या थप्प्या आहेत का आर. डी. एक्ससारखी स्फोटकं आहेत? निदान ब्रीफकेस घेताना नीट विचारुन तरी घ्यायचं." एवढ्या घाईनं माझ्याकडं का देतोस? मी नसतो भेटलो तर काय करणार होतास? त्याने आपली दिली ब्रीफकेस आणि भोटमामासारखी घेतलीत लगेच."

 खरंच, माझ्या हातून बावळटपणाच झाला. बायको जरा रागात बोलली पण खरं बोलली. आपण भेटलोच नसतो तर जगननं काय केलं असतं? निदान त्या ब्रीफकेसमध्ये काय आहे हे विचारण्याचा शहाणपणा तरी दाखवायला हवा होता. माझ्या हातून अनेकदा असा बावळटपणा झालेला आहे. बायको म्हणते ते काही खोटं नाही. दर खेपेला माझाच 'वापर' कसा होतो ते कळत नाही. आता हा जगन माझा बालमित्र. प्रामाणिक आणि सालस अशी सर्वांच्या मनात त्याची प्रतिमा होती. तीच माझ्या डोक्यात ठसली होती. पण नंतर तो वृत्तीने बदलू शकतो असा विचार माझ्या मनात कधी आलाच नाही. आता तो कस्टममध्ये नोकरीला आहे ही गोष्ट सुद्धा आत्ता माझ्या नीट ध्यानात आली! खरं म्हणजे बायकोनं आणून दिली! रायगड जिल्हा, स्मगलर मंडळींचे नंदनवन, त्यांचे आणि कस्टमवाल्यांचे संबंध यावर वर्तमानपत्रांतून रकानेच्या रकाने भरून बातमीपत्रे बघून मी हादरलोच.

 मी आणि बायकोने बराच विचार केला. मित्रांची मदत घ्यावी का? पोलिसाना भेटावं का? का ही ब्रीफकेस कुठंतरी फेकून 'मोकळं व्हावं? अशा अनेक पर्यायांचा विचार केला. पण सगळ्याच गोष्टी धोक्याच्या होत्या. अगदी संपूर्णपणे विश्वास टाकावा असा कोणी नजरेसमोर येईना. पोलिसात जाणं म्हणजे नसता ससेमिरा मागे लावून घेणे! बरं, ब्रीफकेस उचलून कुठं नाहीशी करायची म्हणजे भलतेच भयानक काम. खरंच

बॉम्बस्फोट

/ ११४