पान:निखळलेलं मोरपीस.pdf/११४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

माझ्या बायकोचं ऑफिस वरळी नाक्यावर होतं. परीक्षा तोंडावर आल्यानं दोन्ही मुलं घरीच अभ्यास करत होती. आम्ही राहात असलेल्या प्रभादेवी भागांत खूप गडबड असल्याच्या बातम्या होत्या. अफवांना ऊत आला होता. बस, लोकल कुठंहि बॉम्बस्फोट होण्याची शक्यता होती. सुदैवाने मी तीन चार तासानंतर का होईना पण सुखरूप घरी पोचलो. बायको-मुलांना घरी पाहून आनंदलोच. पण हा आनंद किती क्षुद्र, स्वार्थी होता दुसऱ्या दिवशी उमगले. कारण किती तरी मित्रमंडळी, नातेवाईक बॉम्बस्फोटात सापडून ठार झाली होती. सगळं वाचून अस्वस्थ, उदासीन वाटत होतं. इतकं की आपण जिवंत असल्याची शरम वाटू लागली!

∗∗∗


 पुढील पाच-सहा दिवस याच अस्वस्थतेत गेले. रोजचे दैनंदिन व्यवहार कसे तरी चालू होते. पहिले दोन -तीन दिवस कर्फ्यू होती. साधं दूध आणणं हे सुद्धा मोठ्या जोखमीचे काम वाटत होतं! कोणत्या क्षणी काय होईल याची टांगती तलवारच प्रत्येक मुंबईकराच्या डोक्यावर होती. जागोजागी दंगे उसळलेले होते. भयानक बातम्या कानांवर पडत. मुंबईत अनेक स्फोटके आली आहेत. कोणत्याहि क्षणी स्फोटकांची मालिका पुन्हा सुरु होईल. अनोळखी बॅगा, पिशव्या, गाठोडी वगैरे कुठल्याहि वस्तूला हात लावू नका अश सूचना सर्वत्र - रेडिओ, टी. व्ही; स्टेशन्स अशा ठिकाणी दिल्या जात होत्या. कधी न ऐकलेल्या आर. डी. एक्सचं नाव सतत कानांवर आदळत होतं. एका रात्री बायको म्हणाली, ‘"सारखं टी.व्ही.वर तेच तेच ऐकून कंटाळा आलाय. चला गच्चीत जरा वाऱ्याला जाऊन बसू या." मला पण कल्पना आवडली. बायको जरा गंभीर वाटत होती. गच्चीत गेल्या गेल्या तिनं विचारलं,

 "तुमचा तो जगन म्हात्रे कस्टममध्ये नोकरीला असतो ना?"

 "हो, पण आत्ताच त्याची का आठवण झाली?"

 "रोजचा पेपर वाचता ना?"

 "??"

 "तुमच्या रायगड जिल्ह्यातूनच, समुद्रमार्गाने आर. डी. एक्स. वगैरे स्फोटके मुंबईत येत आहेत ते वाचलंत ना?"

 “बरं मग?” अजून माझ्या डोक्यात काही प्रकाश पडला नव्हता.

 “अहो, त्या अतिरेक्यांना कस्टमवाल्यांची साथ आहे. काही कस्टमचे ऑफिसर्स

निखळलेलं मोरपीस / ११३