पान:निखळलेलं मोरपीस.pdf/११३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 बसचा ड्रायव्हर हॉर्न देत होता.

∗∗∗


 मुंबईला परतल्यावर प्रथम कुठली गोष्ट केली असेल तर ती म्हणजे जगनची ब्रीफकेस व्यवस्थित गोदरेजच्या कपाटात बायकोला बजावून ठेवून दिली.

 रोजचं रुटीन चालू झालं. तीन-चार दिवस गेले.

 दुपारी तीन वाजता चहाचा ट्रे आला. चहा बनवत होतो तेवढ्यात प्रचंड मोठा आवाज आला. ऑफिस एअर कंडिशन असल्याने बाहेरचा आवाज सहसा येत नाही. ऑफिसात एवढा मोठा आवाज आला म्हणजे काही वेगळाच प्रकार असावा असे वाटले. प्युनने पटापट लॉक असलेल्या खिडक्या चाव्या लावून उघडल्या. नरीमन पॉईंट, कफ परेड वगैरे मुंबईच्या उत्तर भागातून आकाशात धुळीचे लोट उठलेले दिसत होते. बाहेर रस्त्यावर हलकल्लोळ माजला होता. लोक रस्त्याने भयभीत होऊन सैरावैरा धावत होते. ज्यांना रस्त्यावरुन धुराचे लोट दिसत नव्हते त्याना भूकंपाचाच धक्का वाटला असावा. भराभर ऑफिसेसमधून लोक रस्त्यावर धावत होते. तेवढ्यात कानठळ्या बसवणारा आणखी एक प्रचंड आवाज ऐकू आला. घाबरुन सर्व खिडक्या पटापट बंद झाल्या. आमच्या ऑफिसातील इमर्जन्सी बेल वाजली. पाठोपाठ माईकवरुन 'हॅलो, हॅलो' असा आवाज आला. ही बेल आणि माईक सिस्टीम आमच्या ऑफिसच्या सर्व म्हणजे पंचवीस मजल्यांवर एकाच वेळेस वाजत असे. अनौउन्समेंटवरुन कळलं की मुंबईत एकापाठोपाठ एक सात-आठ ठिकाणी बॉम्बस्फोट झाले असून सुरक्षितता म्हणून ऑफिस खाली करण्यात येत आहे. सर्व लिफ्टस् बंद असून सर्वानी शांतपणे दोन्ही बाजूच्या स्टेअरकेसवरून खाली जावे. प्रत्येक मजल्याच्या मार्शलने आधी लेडिज आणि पेशंट असलेल्या स्टाफला जाऊ द्यावे. थोड्याच वेळांत आम्ही सर्वजण रस्त्यावर आलो. पोलीस व्हॅन्स, सायरनच्या गाड्या धावत होत्या. पाठोपाठ अॅम्ब्युलन्सेस, खाजगी गाड्या धावत होत्या. सर्व वाहनांतून रक्ताळलेले मानवी देह हॉस्पिटल्स्कडे नेण्यात येत होते. काही टॅक्सीज आणि खाजगी गाड्यांमधून हात तुटलेले, पाय तुटलेले देह, दारे अघडी ठेवूनच नेण्यात येत होते; कारण एका वेळी अॅम्ब्युलन्सेस् तरी किती मिळणार? फोर्टमधली सर्व कार्यालये बंद झाली होती. घरी जाण्यासाठी प्रत्येकाची धावपळ चालू होती. पण जायचं कसं? बसेस्, टॅक्सीज, लोकलगाड्या सगळीकडे माणसांची मुंग्यांसारखी रांग लागली होती.

 वरळीच्या भागात बॉम्बस्फोट होत असल्याच्या बातम्या ऐकून तर मी हबकलोच.

बॉम्बस्फोट / ११२