पान:निखळलेलं मोरपीस.pdf/११२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 मी म्हटलं "सकाळीच. बहुतेक आठपर्यत निघूच. पहाटेपर्यत कार्यक्रम होईल. सकाळी जरा समुद्रावर भटकू. चहा-पाणी झालं की लगेच निघू. म्हणजे दुपारी जेवण करुन रात्रीच्या जागरणाची झोप काढता येईल. का रे? तुला यायचंय का मुंबईला ? गाडीत तशी जागा आहे."

 "नाही रे. मला यायचं नाही. पण थोडं काम होतं. सकाळीच येईन."

 त्याने निरोप घेतला. मित्रमंडळींना गाठण्यासाठी मी झपाझपा पावलं उचलली.

∗∗∗


 रात्री छान सोलकढीचे आणि फणसाच्या भाजीचे जेवण झालं. नंतर गाण्याचा कार्यक्रम पहाटेपर्यंत रंगला. विशेष नाव नसलेला पण चांगल्या तयारीचा असा एक उत्तर हिंदुस्थानी गायक होता. समुद्रकाठचा रम्य परिसर. शांत वातावरण. निवडक पण दर्दी श्रोते. त्यामुळे गायक स्वतः रंगून गेला. यमन - कल्याणचा ख्याल, पिलूमधली ठुमरी, मध्यरात्रीनंतर मालकंसचा बडा ख्याल गाताना त्याने सर्वांना मंत्रमुग्ध करुन टाकले. पहाटे भैरवी झाल्यावर आम्ही सर्वजण समुद्रकिनाऱ्यावर गेलो. किनाऱ्यावर वाळूत बसलो. थंडगार वारं सुटलं होतं. झुंजूमुंजू होतं, त्यावेळच्या अर्ध्यामुर्ध्या उजेडात समोरच मुंबई दिसत होती. 'ताजमहाल' हॉटेल आणि आजूबाजूचा परिसर दिसत होता. त्या प्रसन्न वातावरणात त्या गायकाला अचानक सुरसुरी आली. साथसंगत नसताना एकदम धीरगंभीर आवाजात तो अहिर भैरवाचे स्वर आळवू लागला. खूप मजा आली. मी तर जगनला विसरुनच गेलो होतो.

 पण जगन विसरला नव्हता!

 आम्ही चहा घेत होतो तेव्हा तो आला. आम्ही गप्पा मारत एका कोपऱ्यावर आलो. तेव्हा आजूबाजूला कोणी नव्हतं. जगनने माझ्या हातात एक काळी ब्रीफकेस दिली. म्हणाला,

 “या ब्रीफकेसमध्ये काही महत्त्वाच्या वस्तू-कागदपत्रे आहेत. घरी कोणी नाही. बायका-मुलं माहेरी गेलीत. माझी ड्युटी लागलीय बाहेरगावला. सात-आठ दिवसात मीच मुंबईला येईन तेव्हा ब्रीफकेस घेऊन जाईन." इतकं बोलून तो झपाझपा गेलासुद्धा. जाताना ब्रीफकेस जपण्याबद्दल पुन्हा सांगून गेला. क्षणभर मी चक्रावलोच. काहीतरी खुलासेवजा मी विचारायला हवं होतं. पण बहुदा रात्रीच्या जागरणानं मेंदू सुस्त झाला होता. आणि अंग पार आंबून गेलं होतं.

निखळलेलं मोरपीस / १११