पान:निखळलेलं मोरपीस.pdf/१११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१७. बॉम्बस्फोट


 आमच्या ऑफिसात संगीतप्रेमी मित्रांचा एक खास ग्रुप आहे. मुंबईच्या गजबजाटापासून दूर कुठं तरी शांत, निसर्गरम्य ठिकाणी तीन-चार महिन्यांतून जायचं, कुणा कलाकाराचं मनसोक्त गायन ऐकायचं, मस्तपैकी जेवणखाण करुन भटकंती करायची, चांगलं ताजंतवानं होऊन परतायचं असा आमचा नेहेमीचा रिवाज होता. कधी खंडाळा, कधी लोणावळा, कधी कर्नाळा तर कधी एखाद्याच्या फार्म हाऊसवर. यंदा आम्ही अलिबागजवळच्या किहिमच्या समुद्रकिनारी जमायचं ठरविलं होतं. शनिवारी हाफ डे. दुपारी लवकरच बाहेर पडून आम्ही दादरला एकत्र जमलो आणि स्पेशल बसने निघालो. गायक कलाकार आणि त्याच्या साथीदारांना घेऊन बाकीचे दोघेजण मागाहून येणार होते. रात्री आठच्या सुमारास आम्ही किहिमला पोचलो. किनाऱ्याजवळ एक नारळी-पोफळींनी बहरलेली वाडी होती. अंगणात एक छोटेखानी बैठक सजवली होती. अजून जेवायला वेळ होता. शेजारीच असणाऱ्या सागरांच्या लाटांचा घोंघावणारा आवाज खुणावत होता. बसमध्ये बसून प्रवासात अवघडलेले पाय वाळूत जरा मोकळे करावेत म्हणून आम्ही मित्रमंडळी समुद्राकडे निघालो. पाच-दहा पावलं गेलो तेवढ्यात वाडीचे गावचे सरपंच वगैरे काही प्रतिष्ठित मंडळी भेटली.

 त्यात जगन म्हात्रे होता.

 त्याला बघून मी आनंदलोच. तो पण सुखावला. आम्ही दोघे वर्गमित्र. एकेकाळी आम्हा दोघांची मैत्री हा सर्वांच्या कुतूहलाचा विषय होता. कारण मी स्कॉलर तर तो सर्व खेळांचा राजा. मनाने एकदम सरळ आणि निष्कपटी. त्याच्या याच स्वभावामुळे तो मला इतरांपेक्षा प्रिय होता. तसे आम्ही दोन वर्षेच एकत्र होतो. मी आणि जगन गप्पा मारत एका कातळाशेजारी बसलो. तो कस्टममध्ये होता. त्याचं पोस्टींग सध्या या भागात होतं. मुंबईला ऑफिसच्या कामासाठी आला तर कधी कधी भेट होई. नेहमी खळखळून बोलणारा जगन आज मात्र गंभीर वाटत होता. आमची बरोबरची मित्रमंडळी परतायला लागली तसा मी पण उठलो. जगन गाण्याला यायला तयार नव्हता. सहज फिरत फिरत आला होता. तो परतला. अचानक वळला. त्याने विचारलं.

 "मुंबईला केव्हा परतणार आहात?"

बॉम्बस्फोट / ११०