पान:निखळलेलं मोरपीस.pdf/११०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आणि कुणाला विचारायचे नव्हतेच. आई तर म्हणत होती की त्या काकाने पैसा कसा मिळवला असेल कोण जाणे. त्याचे लक्षण काही ठीक दिसत नव्हते. नकोच तो पैसा आपल्याला. बापूमामांनी वेगवेगळ्या दृष्टीकोनातून चर्चा केली. पण आमचा निश्चय होता. शेवटी बापूमामाच म्हणाले,

 'त्या काकाच्या पैशाचा अगदीच अनादर केला असं होऊ नये म्हणून आता विनिमयाचा दर वाढले म्हणून जे काल पाच लाख रूपये तुम्हाला मिळाले ते तुम्ही काकाचा आदर म्हणून मुलांच्या शिक्षणासाठी ठेवा आणि बाकीचे पंचवीस लाख आश्रमाला द्या. मी सॉलिसिटरना घेऊन येतो आणि मग सगळ्या कागदपत्रांची पूर्तता करू. म्हणजे तुला पंचवीस लाख मिळाले असं गावात जे सगळ्यांना माहीत झालंय ते सगळेच्या सगळे दान केले असे सगळ्यांना कळेल. कालच्या पाच लाखाचे कुणाला माहीत नाही ते इथल्याच बँकेत फिक्स डिपॉझिटमध्ये ठेवा म्हणजे झालं.'

 आम्हाला पटलं. आम्ही मान डोलावली.

∗∗∗


 आज मी सुखात आहे. जिकडे-तिकडे माझे वर्तमानपत्रात फोटो येत आहेत. रकानेच्या रकाने भरून कौतुक होत आहे. पुन्हा आम्ही आमच्या 'स्वगृही' परतलो आहोत. आमची बँक 'देणगी' दिल्याशिवाय कुणाला नोकरीवर घेत नाही. मला संचालकानी सन्मानाने परत नोकरीवर घेतलं.

 आता गुंडुदादाच्या मवाल्यांची मला भीती वाटत नाही!

 श्रीमंती गेल्यामुळं सुखात असणारा या जगातील मी कदाचित् पहिलाच मानव असेन!

निखळलेलं मोरपीस / १०९