पान:निखळलेलं मोरपीस.pdf/१०९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आम्ही घरी आलो. रात्री बापूमामांना सगळं सांगावं आणि त्यांचा सल्ला घ्यावा असं आम्ही दोघांनी ठरविलं होतं. पण रात्री बापूमामांना घरी यायला खूप उशीर झाला. त्यांच्या अनाथाश्रमात कसला तरी समारंभ होता. ते म्हणाले म्हणून आम्ही दोघं आश्रम बघायला गेलो.

 आम्ही आश्रमात गेलो तेव्हा प्रवेशद्वाराशीच गडबड उडालेली होती. एक छोटं अर्भक आश्रमाच्या दाराशीच कुणी तरी पहाटेच आणून ठेवलं होतं. नुकतंच जन्मलेलं असावं. मिटलेले डोळे, वळलेल्या मुठी, लालसर चेहरा असं त्याचं रूप मोठं गोंडस दिसत होतं. अनैतिक संबंधातून जन्मलेलं मूल कुणा तरी कुमारिकेने समाजाच्या भीतीने आणून टाकलं होतं. अशी अनेक छोटी अर्भकं, लहान मुलांच्या वॉर्डात आम्ही बघितली. बापूमामा म्हणाले तसं अशी अनेक अनाथ बालके असतील जी आश्रमांपर्यंत पोचू न शकल्यामुळे या जगात आल्या आल्याच त्यांना देवाघरी जावं लागत असेल. अशा तीनशे-चारशे अनाथ मुलांचं संगोपन, शिक्षण आश्रमात केलं जात होतं. नवऱ्यानं टाकलेल्या, आई- बाप वा अन्य कुणाचाच आधार नसलेल्या, निराधार स्त्रियांना या आश्रमाचाच आधार होता. इथली बरीचशी कामे त्याच करीत होत्या. समारंभासाठी आलेल्या पाहुण्यांना बापूमामा सांगत होते की अशा सर्व निराधार बालकांना, स्त्रियांना, वृद्धांना आश्रमात आश्रय द्यावासा वाटतो; पण पैशाच्या कमतरतेमुळे मनात अतीव इच्छा असूनही काही करता येत नाही. समारंभात पाहुण्यांनी स्वतः देणगी जाहीर केलीच पण भाषणात कळकळीचे आवाहन केले की समाजातील प्रत्येकाने आपल्याजवळ आहे त्यातील थोडं तरी अशा सेवाभावी संस्थांना दिलं पाहिजे.

 नेमकं त्याचवेळी माझं लक्ष बायकोकडं गेलं. ती पण माझ्याकडेच बघत होती. दोघांच्याहि मनातले विचार आम्हा उभयतांना एकाच वेळी कळाले.

 आश्रमातील एकेकीच्या करूण कहाण्या ऐकता ऐकता आमचा पाय निघत नव्हता. लहान लहान मुलं घट्ट बोट धरून विचारत, 'काका आम्ही येऊ का तुमच्याबरोबर?' समारंभावरून येताना आम्ही एका हॉटेलात थांबलो. खूप विचार केला. बापूमामांना यायला थोडा उशीर होणार होता. आमचा विचार पक्का झाला.

 रात्री जेवणं झाल्यावर, बापूकाकांना निवांतपणे सगळी, अथपासून इतिपर्यंत, इत्यंभूत हकीगत सांगितली. काकाकडून मिळालेली सगळी इस्टेट आश्रमाला देणगीदाखल देण्याचे ठरविले असल्याचं सांगितले. तेव्हा ते थोडे विचारात पडले. म्हणाले की असं भावनेच्या भरात काही ठरवू नका. वाटल्यास दोन दिवस राहून पुन्हा विचार करा.

 आम्ही त्यांच्या आग्रहाखातर दोन दिवस राहिलो. आमचा विचार ठाम होता.

श्रीमंतीचं दुखणं / १०८