पान:निखळलेलं मोरपीस.pdf/१०८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 "काय तुमचं असेल तसं सांगा. मी विचारं करेन."

 "विचार-बिचार काही करायचा नसतो. आम्ही म्हणू ते गुमान द्यायचं असतंय. पुढच्या महिन्यात गुंडुदादाला इचारुन येतो. काय घ्यायचं, काय न्हाई ते प्रत्येकाचा दापाणी बघून त्योच ठरवतय."

 असं म्हणून ते उठले. मी दार लावून घ्यायला गेलो तेव्हा ते म्हणाले, "उगाच पोलिसात कळवायला जाल तर फुकट मराल. समदीकडं आमची मानसं असत्यात.”

 बायको विचारायला लागली तेव्हा मी आधी डबडबलेला घाम पुसला. घोटभर पाणी प्यालो आणि सगळा प्रकार तिला सांगितला.

 ही फुकटची श्रीमंती आता अंगाशी यायला लागली.

 प्रकार हतबुद्ध करणारा होता. चाळीत होतो तेव्हा पेपरमधल्या बातमीवरुन असलं काही कानावर यायचं. आता काहीतरी विचार करायला हवा. पण नेमकं काय करायचं ते कळत नव्हतं. आम्ही दोघांनी ठरवलं की घरात काही वाच्यता करायची नाही. ते धटिंगण पुढच्या महिन्यात येतो म्हणालेत म्हणजे अजून 'मरण' लांब आहे.

 दुसरे दिवशी डोअरबेल वाजली तसा मी मनातून घाबरलो. वरकरणी तसं न दाखवता मी दार उघडलं.

 दारात पोस्टमन उभा होता. जुन्या घरी जाऊन शोधत शोधत इकडे आला होता.

 आफ्रिकन कॉन्स्यूलेटकडून पत्र होतं. काकांनी ठेवलेल्या रकमेत आणखीन् थोडीशी वाढ झाली होती. रूपया-पौंडांचे विनिमय दरात फेरफार झाल्यामुळे. मला काही कागदपत्रांवर सह्या करण्यासाठी मुंबईला बोलावलं होतं.

 काका आमच्या राशीलाच बसला होता!

 मी आणि बायको मुंबईला गेलो. एरवी आम्ही एखाद्या उंची हॉटेलात उतरून जिवाची मुंबई केली असती. पण आता सगळी चवच गेली होती. या श्रीमंतीचं ओझं, श्रीमंतीचा विळखा केव्हा सुटेल असं आम्हाला झालं होतं. आम्ही चाळीत राहणाऱ्या बापूमामांकडे उतरलो. बापूमामा मोठे स्वच्छ मनाचे आणि निरपेक्ष बुद्धीचे होते. आपली नोकरी इमाने इतबारे करत, बरंच काही सामाजिक कार्य करीत. एका अनाथाश्रमात कोणतेहि मानधन न घेता, वर्षानुवर्षे ते सेक्रेटरी म्हणून काम करत होते. मुंबईत त्यांच्या नावाला मान होता. सर्वत्र त्यांच्या शब्दाला किंमत होती. आम्हाला अचानक लाभलेल्या श्रीमंतीची त्यांना काहीच कल्पना नव्हती. आफ्रिकन वकिलातीमधलं काम झाल्यावर

निखळलेलं मोरपीस / १०७