पान:निखळलेलं मोरपीस.pdf/१०५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सुरुवातीला या वेगवेगळ्या नळांचे उपयोगच मला कळेनात. वॉश बेसिनचा नळ उघडला रे उघडला की धबधबाच अंगावर कोसळावा इतक्या फोर्सने पाणी अंगावर यायचं. आम्ही सगळ्यांनीच लहान मुलासारखे अंगावरचे कपडे भिजवून घेतले! गुबगुबीत सोफा, बेडस्, एअर कंडीशनर असं सगळं बघून मला हिंदी सिरीअल्समधील चकचकीत घरं आठवायची; आणि अशा घरातून आपण राहायचं? अंगावर काटाच आला. फ्लॅटला दारं आणि खिडक्या इतक्या होत्या की एकसारखं भन्नाट वारं यायचं; पहिल्या दोन-चार दिवसातच बायकोला थंडी बाधली. फटाफट शिंका येऊ लागल्या. कुणी कौतुकानं घर बघायला आलेल्या माणसाशी बोलण्यासाठी तोंड उघडावं तर नाकच 'बोलू' लागायचं. एक खट्याळ आत्या म्हणाली.

 "अरे तिला सर्दी होणारंच रे. श्रीमंतीची तिला सवयच नाही. कोंदट चाळीतून रहायची सवय होती ना तिला?"

 ती डिवचून बोलली खरी. पण ते खरं होतं. श्रीमंतीची सुद्धा सवय असावी लागते. नुसतं श्रीमंत असून भागत नाही. श्रीमंत दिसावंहि लागतं!

 आणि 'ह्या' मुद्यावर तर आम्ही चांगलाच मार खात होतो!

 आम्ही सर्वजण एकजात ठार काळे होतो. काळे म्हणजे अगदीच काळेकुट्ट होतो. त्यात पुन्हा काटकुळे होतो. एकाच्या अंगावर मूठभर मांस असेल तर शपथ. आरशात बघायची आमची आम्हालाच भीती वाटायची. काळ्या चेहऱ्यावर फेस पावडर लावली की सांगली कोल्हापूरकडचे खारे शेंगदाणे कसे दिसतात तसे आम्ही दिसायचो. एरवी या काळेपणाचे आम्हाला एवढं वाईट वाटलं नसतं. पण या पॉश सोसायटीतील सगळेच्या सगळे गोरेपान होते. कुटलाशा एका गेट-टुगेदरला आम्ही जमलो तेव्हा तर एखाद्या राजहंसांच्या कळपात कावळ्याची पिले सापडावीत तसे आम्ही दिसत होतो! सगळ्यांनाच ते जाणवत असावं म्हणून काही तरी थाप मारुन मी आमच्या सगळ्या फौजा काढून घेतल्या! सरळ घरी आलो.

 हा न्यूनगंड आम्हांला फारच जाणवू लागला. आणि आम्ही त्या सोसायटीत राहायला गेलो तेव्हा तर समारंभांना उत आला होता. सोसायटीची निवडणूक, सोसायटीचा 'अॅन्युअल डे'- फंक्शन, रोझ डे, असे अनेक सामुदायिक स्वरुपाचे समारंभ हटकून त्याच वेळी आले. आणि इच्छा नसतानासुद्धा, सोशल एटीकेटस् म्हणून मला आमची 'शोभायात्रा' काढावी लागली. बायको तर फारच वैतागून गेली होती. सोसायटीत हळदीकुंकुवासारख्या, संक्रांतीसारख्या निमित्तानं कुणी बोलावलं तरी तिच्या अंगावर काटा यायचा! एखाद्या चॅरिटी शोची तिकिटे आपण मोठ्या धनिकांच्या गळ्यात बांधतो. पण बडी माणसं कशाला येतात चॅरिटी शोला ? ती मंडळी आपले मुनीमजी, दिवाणजी,

श्रीमंतीचं दुखणं / १०४