पान:निखळलेलं मोरपीस.pdf/१०४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पैसा कसा दुप्पट होईल, तिप्पट होईल ते बिचारी समजावत होती. पण माझा प्रश्न गंभीर होता. दुप्पट, तिप्पट काय, पण हाती आलेला पैसा मुळातच शतपट, सहस्त्रपट होता!

 मग आम्ही कुटुंबियांनीच एकत्र बसून हा श्रीमंतीचा अचानक उद्भवलेला 'लाखमोला'चा प्रश्न सोडवण्याचं मनावर घेतलं. ऐकावं जनाचं करावं मनाचं हेच खरं. आमचं शांत जीवन किती सुखात चाललं होतं. हा काका कुठून मध्येच उपटला?

 प्रथम आम्ही ठरवलं की गावाबाहेर एक छान प्रासादतुल्य असा एक मोट्टाऽऽ बंगला बांधायचा. भोवतीनं प्रचंड मोठी बाग. जमलं तर ते फार्म हाऊस, ग्रीन हाऊस म्हणतात तसं. किमान तीन-चार तरी गाड्या राहतील एवढं मोठं गॅरेज. बंगल्याच्या प्रवेशदाराशी रखवालदारासाठी, पॅगोडासाठी बांधतात तशी पर्णकुटी. सर्वत्र लॉन, कारंजी यांची लयलूट. बंगल्याकडं येणारा रस्ता दुतर्फा फुलझाडांनी मढवून टाकायचा.बागेत आंबा, चिकू, पेरु, नारळ, पपया अशा झाडांची लयलूट करायची. बायकोनं तेवढ्यात कढीलिंबाचं नाव सुचवलं ! नेहेमीच स्वैपाकात लागणारा पदार्थ. उगाच तेवढ्यासाठी शेजारी-पाजारी जाऊन तोंड वेंगाडायला नको! व्यावहारिक विचार !

 घराला नाव द्यायचं ठरलं "काकस्मृती." त्या दयाळू काकाची आठवण आम्ही नाही ठेवायची तर कुणी ठेवायची?

 पण लालचुटुक गुलमोहराच्या सावलीत बसून चहाचे घुटके घेत बसण्याचं स्वप्न सहजासहजी साकार होण्याचं लक्षण दिसेना. आम्हाला पसंत असलेली जागा, त्यातील कायदेशीर अडचणी, प्लॅनची मंजूरी, प्रत्यक्ष बांधकाम या सर्व कामात बराच वेळ जाणारसे दिसायला लागले. आणि आम्हाला तर लौकरात लौकर श्रीमंत व्हायची घाई होती!

 आमच्या चलाख इस्टेट डेव्हलपरच्या लक्षात ही गोष्ट आली. मग त्यानंच एक आयडिया लढविली. तो म्हणाला की साहेब, इथल्या पॉश, एकदम पॉश वस्तीत त्याच्या एका कस्टमरचा एक आलिशान फ्लॅट आहे; तो कस्टमर सध्या सिंगापूरला आहे. सहा महिने तरी फ्लॅट रिकामा आहे. फर्निचरसह वेल-फर्निश्ड फ्लॅट मला राहायला मिळेल. तोपर्यंत बंगल्याचं काम मार्गी लागेल. फ्लॅटचं भाडं तसं फार नाही. सध्याच्या मार्केट- रेटप्रमाणे अवघे महिना पंधरा हजार ! नोकरीत असताना माझी मासिक आमदनीची उलाढाल होती सहा-सात हजाराची ! फ्लॅटचं भाडं ऐकून माझी छाती पाव इंचसुद्धा दडपली नाही. माझी छाती आता माझी नव्हतीच. ती होती काकाची!

 एका सुमुहूर्तावर आम्ही फ्लॅटमध्ये शिफ्ट केलं. आता बिऱ्हाड केलं म्हणायचं नाही. आता आपला 'कल्चर' बदलायला हवा. फ्लॅट आणि त्यातील फर्निचर बघून मात्र आम्ही चाट पडलो. बाथरुम सिंकमध्ये चकचकीत, इतके प्रचंड संख्येने असलेले स्टीलचे नळ मी प्रथमच पाहात होतो. एकातून गरमागरम पाणी तर दुसऱ्या नळातून गार पाणी.

निखळलेलं मोरपीस / १०३