पान:निखळलेलं मोरपीस.pdf/१०६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

नाही तर गडी माणसं यांना आपली तिकिटं देऊन टाकतात. तशी कुणाची तरी तिकिटं घेऊन आल्यासारखे आम्ही त्या सोसायटीत दिसत होतो. आमच्या श्रीमंतीचे 'मूळ' कळल्यावर काळ्या आफ्रिकेतील काळ्या खाणीतील माणसं असं त्या सोसायटीतील मंडळी आमच्या माघारी चिडवायची. आमचा काका म्हणे हिऱ्यांच्या खाणीत काम करायचा! कुणा टारगट मुलांनी तर आमच्या दारावर 'आफ्रिकेचे हायकमिशनर' असं लिहून ठेवलं होतं!

 आमच्या या न्यूनगंडाची आम्हाला प्रखरतेने जाणीव झाली ती मारुती कारची चौकशी करताना. मी चुकून सोसायटीत कानविंदे यांजकडे त्यानी नवीनच घेतलेली मारुती ८०० बघताना एखादी कार घ्यायचा विचार बोलून दाखवला होता. एका सकाळी एक रुबाबदार माणूस आमच्याकडे आला.

 “कानविंदेसाहेब म्हणत होते तुम्हाला गाडी घ्यायचीय म्हणून.” माझ्याकडे आपादमस्तक न्याहाळत तो म्हणाला. एकूण त्याला ही गोष्ट फारशी विश्वसनीय वाटली नसावी!

 मी चाचरत चाचरत हो म्हटलं. मग त्यानं आम्हाला तयार राहायला सांगितलन. एका गोल्डन कलरच्या ए.सी. कारमधून त्यानं आम्हाला त्यांच्या शो-रुमकडे नेलं. तो स्वतः इतका रुबाबदार होता की एखादा श्रीमंत, आपल्या नोकर-चाकरांना आणि त्यांच्या बायका-मुलांना फिरवून आणत आहे असंच वाटत होतं! आम्हाला धड दार लावता येत नव्हतं की गाडीच्या काचा लावता येत नव्हत्या. त्यांच्या मिटींग हॉलमध्ये एजंटस् अशी काही गाड्यांची नावं सांगत होता की जी नावं आमच्या कानांवरुनहि गेली नव्हती! गाड्यांविषयीची आमची प्राथमिक माहितीच अगदी तुटपुंजी होती. गाड्यांचे एवढे प्रकार असतात हेच मुळी आमच्या गावी नव्हतं! काही तरी थातूर-मातूर बोलून आम्ही परतलो.

 दुपारी झोपून उठतोय तो पुन्हा आणखी एक एजंट आला. मनात धडकी भरली. म्हटलं, हा काही आणखी गाड्या-विमानं वगैरे दाखवायला नेतोय की काय? "मला कानविंदेसाहेबांनी पाठवलंय. आपल्याला काही गुंतवणूक वगैरे करायची आहे ना? माझ्याकडं काही सेफ स्कीमस् आहेत. शेअर्स डिबेंचर्स, एफ.डी.साठी काही करायचं असेल तर सांगा."

 त्याचा स्वर अगदी आर्जवी होता. त्याची पर्सनॅलिटी एवढी रुबाबदार होती की त्याला जा म्हणवेना. आणि एकदा संभाषण सुरु झाल्यावर त्याच्याविषयी इतका विश्वास वाटायला लागला की बोलण्याच्या भरात काका, त्यांची मिळालेली इस्टेट याविषयी मी मोकळेपणानं बोललो. पण सगळं काही ऐकून मला तर साऱ्या श्रीमंतांची कीव यायला

निखळलेलं मोरपीस / १०५