पान:निखळलेलं मोरपीस.pdf/१०३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१६. श्रीमंतीचं दुखणं


 तसा मी अलीकडेच श्रीमंत झालो. अगदी अचानक. जगात काही गोष्टींची संगतीच लागत नाही. राज्याचा स्वामी असलेला राजा निपुत्रिक मरतो. त्याचा वारस शोधण्यासाठी हत्तीच्या सोंडेमध्ये पुष्पमाला दिली जाते. आणि तो हत्ती गावाबाहेर भटकणाऱ्या पोराला तो हार घालतो. त्याला राजपद मिळतं.

 तसं माझं झालं. कोण्या एके काळी आफ्रिकेत गेलेल्या माझ्या चुलत्याची इस्टेट जवळचा एकमेव वारस म्हणून माझ्या हाती आली.

 प्रचंड मोठी इस्टेट! म्हणजे नक्की किती ते सांगत नाही. सार्वजनिक सुरक्षिततेच्या कारणासाठी!

 गंमत म्हणजे या काकाला, मी काळा की गोरा बघितला नव्हता. आई म्हणते त्यानं मात्र लहानपणी मला खेळवलं होतं. कधीहि बाहेरुन आला की न चुकता माझ्या हातावर खाऊ ठेवत असे.

 आणि आता 'जाताना' बिचारा प्रचंड खाऊ ठेवून गेला! आम्ही वाशीकर माणसं आयुष्यात कधी वेशीबाहेर पडलो नाही. आणि आमचा हा काका चक्क आफ्रिकेलाच गेला.

 ते काही असो. पण हाताच्या मुठीत न मावणारा हा खाऊ 'सांभाळायचा' कसा याची आता मला चिंता लागली होती.

 त्यातच अत्यानंदाच्या पहिल्या ऊर्मीसरशी मी माझ्या धनगौडा वीरगौडा बँकेतील नोकरीचा राजीनामा देऊन आलो होतो; त्यामुळे तर काळजी करण्याचा कालावधी अधिकच वाढला होता! एरवी कामात गुंतलेला असतो म्हणजे अचानक लाभलेल्या या श्रीमंतीची चिंता मला लागली नसती!

 हल्ली तर आमच्या घरात लोकांची ये-जा पण वाढली होती. माहीत असलेले, नसलेले अनेक सगे-सोयरे भेटून गेले. समाचाराला यावेत तसे! बायको म्हणते 'असतील शिते तर जमतील भूते' अशातला प्रकार होता. पण मला मात्र ते पटलं नाही. केवळ मी पैसा कसा चांगला ‘इन्व्हेस्ट' करावा एवढंच सांगण्यासाठी सारीजणं झटत होती. आलेला

श्रीमंतीचं दुखणं / १०२