पान:निखळलेलं मोरपीस.pdf/१०२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 साठे अभावितपणे म्हणाला "हो"

 "मग प्लीज जरा या तिरडीवर पडून दाखवा ना. म्हणजे मला बांधायला सोपं पडेल."

 तेव्हापासूनच साठेनं वशाचा धसका घेतलेला होता!

 देशमुखने बरीच खटपट करून साठेला मूडमध्ये आणलं. त्याला असं कोसळू देणं धोक्याचं आहे असं जाणवून देशमुखनं सरळ दोन दिवस रजा घेतली. केवळ साठेच्या देखभालीसाठी. हॉस्पिटलच्या डॉक्टर्सच्या संमतीने आपल्या नात्यातील दुसऱ्या तज्ञ डॉक्टरांना घेऊन आला. साठेबरोबर एकसारखं वावरून त्याला पूर्ण उत्साहात, आनंदात ठेवलं. त्याच्या परिश्रमाला फळ आलं.

 साठे आठ दिवसातच डिस्चार्ज मिळून सुखरून परत आला.

 साठेला सुखरूप घरी आलेला पाहून सोसायटीत सर्वांनी आनंद झाल्याचं दाखवलं. पण त्यांच्या चेहऱ्याआड लपलेली 'अंदरकी बात' देशमुखला कळली. सर्वांच्या मनावर भीतीची छाया पुन्हा पसरली. अन्न गोड लागेना. साठे मरता मरता वाचला म्हणजे मृत्यूरूपी बकासूराच्या तोंडी जाणारा तिसरा कोण? प्रत्येकजण मनातल्या मनात ‘तिसऱ्या' बळीसाठी दुसऱ्याचीच योजना करू लागला! परमेश्वरानं त्याला 'उचलावं’ अशी आशा करू लागला.

 अशा अनिश्चिततेत दिवस जात होते.

 दुसऱ्या बाजूला महाजनने देशमुख आणि बुवा गोसावीखेरीज सर्वांना विश्वासात घेऊन हरिभटाला बोलावून तो म्हणेल तसा आणि तो म्हणेल तितका पैसा खर्च करून शांत करण्याची योजना आखली तारीख नक्की करून सगळीजणं घरी आली.

 आणि त्याच रात्री देशमुखच्या घरातून किंकाळी फुटली. देशमुखच्या वृद्ध काकांना हार्ट अॅटॅक आला आणि तडकाफडकी त्यांना मरण आलं.

 घरात शोकमग्न होऊन बसलेल्या सर्वाचे 'सुस्कारे' मनातल्या मनात स्पष्टपणे ऐकू आले. झाली SS एकदाची "इजा बिजा आणि तिजा."

 बुवा गोसावी तेवढा कपाळावर हात मारत म्हणाला, "देवा तू पण आजकाल याच लोकांच्या बाजूचा झालास का रे?"

 ‘तिजा’ झाल्यानं महाजन आणि मंडळी खुशीनं एकमेकांच्या हातावर टाळी देत असलेली त्याला अंधारातही दिसत होतं.

निखळलेलं मोरपीस / १०१