पान:निखळलेलं मोरपीस.pdf/१०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

‘गेला’ म्हटलं की फुरफुरायला लागायचे! लगबगीने सगळं 'सामान' त्वरेने मिळवण्यात त्याचा हातखंडा होता. ‘स्मशान सम्राट' म्हणवून घेण्यात त्याला फुशारकी वाटायची. त्याची 'वाणीपण' या त्याच्या 'छंदा'ला शोभेशी होती. येता-जाता दिसेल त्याला आपल्या दंडावर थोपटत या 'समर्थ' खांद्यावरून आपली 'पालखी' केव्हा न्यायची असे विचारत असे. या देशमुखचेच वृद्ध काका संध्याकाळी ढास लागली म्हणून थांबले तेव्हा हा ‘वशा' त्यांना आपल्या खांद्यावरून आजवर नव्व्याण्णव लोक 'गेले' आता शंभराव्या ‘विकेटची’ वाट बघतोय असं सांगत होता! देशमुखच्या काकांना तेव्हा दरदरून घाम फुटला! 'चैतन्य' सोसायटीच्या इजा बिजाची कथा त्या वशाच्या कानावर गेली तेव्हा या सोसायटीवाल्यांचे लौकरच 'तीन तेरा' वाजणार अशी भविष्यवाणी त्यानं उच्चारली होती! कुणी न विचारताच 'तीन तेरा' ची फोड तो स्पष्ट करून सांगत असे. तीन तेरा म्हणजे या सोळा मेंबर्सच्या सोसायटीत 'तीन' जाणार आणि 'तेरा' राहणार !

 तेव्हा असा एवंगुणविशिष्ट 'वशा' जेव्हा साठेला भेटायला हॉस्पिटलमध्ये आला तेव्हा साठेचं धाबंच दणाणलं! दातखीळ बसायचीच बाकी होती. चेहरा पांढराफटक पडला. हा वशा आता आपल्याला 'न्यायलाच' आला आहे असाच ग्रह त्याने करुन घेतला की काय कोण जाणे? सबंध दिवस कोणाशी बोलला नाही. कोणी आलं की मान फिरवून झोपायचा. घरच्या मंडळींना 'वशा' खांदे कर प्रकरण माहीत असण्याची शक्यताच नव्हती. त्यामुळे साठेच्या वागण्यातील चमत्कारीकपणा हा त्यामुळे आहे हे त्यांच्या कसे लक्षात येणार? रात्री देशमुख आला तेव्हा सगळा हा प्रकार त्याच्या लक्षात आला. तरीपण साठेनं त्याचा इतका धसका घ्यावा हे त्यालाही नवलच वाटलं. त्यानं जेव्हा खोदून विचारलं तेव्हा साठेकडून कळलेल्या हकीगतीनं त्याला हसू फुटलेच. पण हॉस्पिटलमधील बेडवर झोपलेल्या साठेची पण कीव आली. आजारपणात माणूस किती सैरभैर होतो याची कल्पना आली. गंमत अशी झाली होती की जेव्हा सोसायटीचा बिल्डिंगमधील कुलकर्णी रास्तेच्या पाठोपाठ गेला तेव्हा 'पुढच्या' तयारीसाठी वशा आलेला होता. अंगणात सगळी जमली होती. वशा सराईतपणे काठ्या बांबू जुळवून, पांढरा मांजरपाट त्यात पांघरून तिरडी बांधायच्या तयारीत गुंग होता. मोठ्या उत्साहात त्याचं काम चाललं होतं. अचानक तो अंमळ विचारात पडला. उभ्या असलेल्या पुरुष मंडळींकडं बारकाईनं पहाता त्याची नजर एकदम साठेवर स्थिरावली. काही तरी कोडं सुटल्यासारखा आनंद त्याच्या चेहऱ्यावर पसरला. त्याने पटकन् साठेला जवळ बोलावलं. साठेला वाटलं की काहीतरी ब्लेड, कात्री, काथ्या असलं काही वशाला असेल. पण वशा एकदम म्हणाला-

 "अहो साठे, हा गेलेला कुलकर्णी तुमच्याएवढाच उंचीचा असेल ना?"

इजा बिजा आणि तिजा / १००