तोंडून येत नसते. आज दहा वर्षे रानड्यांजवळ ते शिकत होते. मनानें बुद्धीनें, हृदयानें शिकत होते. वागावें कसें, लिहावें कसें, बोलावें कसें, शांत रहावे कसें- या सर्वांचे धडे त्यांनी घेतले. रानड्यांच्या तालमीत पूर्णपणे तयार झाले तेव्हां त्यांचे वय फक्त तीस वर्षांचें होतें. या होतकरू तरुणास पुढल्याच वर्षी आपल्या गुरूजवळ शिकलेल्या विद्येत परीक्षा देण्याची वेळ आली. परीक्षा घेणारा तिऱ्हाईत असला म्हणजे परीक्षा जास्त कसोशीनें होते. गोपाळरावांची परीक्षा इंग्लंडांत होणार होती. आणि त्या परीक्षेस जाण्याची ते तयारी करूं लागले.
१८९६ मध्ये इंग्लंडमध्ये कान्झर्वेटिव्ह पक्ष सत्तारूढ होता. ज्या खर्चाचा बोजा वास्तविक रीत्या इंग्लंडवर पडावयाचा तो हिंदुस्थानावर पडतो असा गवगवा होत होता. तेव्हां या प्रकरणाची चौकशी करण्याकरितां एक कमिशन नेमण्यांत आलें. हें कमिशन वेल्बी कमिशन म्हणून प्रसिद्ध आहे. हिंदुस्थानांतून या कमिशनपुढे साक्ष देण्यासाठीं वाच्छा हे जाणार होते. मुंबई प्रेसिडेन्सी असोसिएशनतर्फे व डेक्कन सभेचा सेक्रेटरी या नात्यानें गोपाळराव गोखले यांनी इंग्लंडांत साक्ष देण्यास जावयाचें असें ठरलें. वाच्छा हे कसलेले, नांवाजलेले आंकडेशास्त्रज्ञ होते. गोपाळरावांचा या अभ्यासाबद्दल लौकिक अद्याप झाला नव्हता. रानड्यांनी मात्र १८९० मध्येच जुन्नरहून लिहिलेल्या मागें दिलेल्या पत्रांत गणेशपंत जोशी यांस गोखले हे तुमच्याबरोबर अभ्यास करण्यास योग्य आहेत असें लिहिलें होतें. त्या गोष्टीस आज सहा वर्षे झाली होती. गोपाळरावांनी सांगोपांग अभ्यास केला होता. आतां तर त्यांनी तीन महिने जय्यत तयारी चालविली. मुंबईहून पुणे, पुण्याहून सोलापूर, तेथून पुनः मुंबई असे त्यांनी किती तरी खेटे घातले! रा. ब. गणेशपंत जोशांजवळून सर्व बारीकसारीक माहिती, टांचणे, टिपणें सर्व कांहीं तयार करून घेऊन ठरलेली वेळ येतांच गोपाळराव हिंदुस्थानची तरफदारी