Jump to content

पान:ना. गोखले चरित्र.pdf/८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५७
गोखल्यांचा भिडस्तपणा आणि तज्जन्य गोंधळ.

करण्याकरितां त्याच्या वतीने साक्ष देण्यासाठी इंग्लंडास चालले. बालसूर्य उदयाचलावर येऊं लागला. हिंदुस्तानचा किनारा दिसेनासा झाला. परिचित मित्रमंडळी दूर राहिली. प्रथम प्रथम गोपाळरावांस चैन पडेना. अफाट आकाश आणि अनंत सागर यांच्याकडे ते कित्येक वेळां पहात बसले असतील. समुद्राच्या लाटांप्रमाणेंच त्यांचें मन खालीं वर होत असेल. ज्या कार्यासाठी आपण जात आहों तें आपल्या हातून नीट तडीस जाईल कां? आपल्या गुरूच्या अपेक्षा आपल्या हातून सफल होतील काय? परकी समाजांत आपणास नीट वागतां येईल कां? इत्यादि विचारांनी त्यांच्या मनांत खळबळ उडविली असेल. कॅले येथे गोपाळरावांस केबिनमध्ये मोठा धक्का बसला आणि त्यांची छाती किंचित् दुखूं लागली. त्यांस वाटलें कीं, दोन दिवसांनी थांबेल; म्हणून त्यांनीं तिकडे दुर्लक्ष केलें. गोखले इंग्लंडमध्ये आल्यावर प्रथम वाच्छांकडेच राहिले. वाच्छा हे केंब्रिज लॉजमध्ये रहात होते. तेथेंच प. पूज्य दादाभाई रहात असत. दादाभाई हे कमिशनमधील एक सभासद होते. गोपाळराव आधींच अत्यंत भिडस्त आणि लाजाळू; त्यांतून ते आतां परक्या समाजांत आलेले! पंचहौद मिशनमधील चहा प्रकरणावर ज्या समाजांत प्रचंड वादविवाद झाले, त्या समाजांतील गोखले तेथे गोंधळून गेले. बायकां- पुरुषांमध्ये, पारशांमध्ये मिळून मिसळून वागण्याचा त्यांस अद्याप सराव नव्हता. त्यांना कसेंसेंच वाटे. इकडील राहणी अद्याप त्यांस नीटशी समजेना. पहिले दोन दिवस तर ते मोठया सावधगिरनिं वागत होते. न जाणों कोठें एकादा शिष्टाचार चुकावयाचा! गोपाळराव या गोष्टीस फार जपावयाचे; इतके कीं तें करणें हस्यास्पद व्हावयाचें. दोन दिवस झाले. तिसऱ्या दिवशीं त्यांचे छातींतील दुखणे जास्त झालें. ते दोन दिवस काळजी घेत होते; परंतु आतां वेदना सहन करवतना. दुःख असह्य झालें आणि गोपाळराव अस्वस्थ झाले. दादाभाईकडे समक्ष जाण्यास ते भीत. त्यांस आपण कसें सांगावें असें त्यांच्या गुरुजनांविषयी आदर ठेवणाऱ्या मनास वाटे. त्यांनी ही गोष्ट वाच्छांच्या कानावर घातली. त्यांची सहनशक्ति, आपले दुःख षट्कर्णी होऊ न देतां तें मुकाटपणें मनांत गिळून राहणें हें पाहून वाच्छा कळवळले. परक्या देशांत