Jump to content

पान:ना. गोखले चरित्र.pdf/६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३४
रानड्यांच्या उपदेशाचें सार.

व्हावे अशी सद्गुरूची इच्छा असल्यामुळे तो शिष्याची मनोभूमिका जशी प्रथम साफ करितो, तेथील दुराग्रह व कोते विचार बाहेर काढून लावतो त्याप्रमाणेंच रानड्यांनीं केलें. गोपाळरावांचे अद्याप बाह्यलक्ष होतें. शिष्य प्रथम बहिर्दृष्टि असतो. सद्गुरु त्यास अंतर्मुख करितो. त्याप्रमाणे केवळ शब्दांवर भिस्त न ठेवतां अर्थाकडे ओढा पाहिजे हें रानड्यांनी गोखल्यांस शिकविलें. विचारांत गांभीर्य व सौंदर्य असावें; भाषेत नटवेगिरी नसावी, अंतःकरण उदात्त असावें; देहाची फार जोपासना नको, परंतु अंतःकरणासाठीं देहाची जरुरी आहे आणि देहरक्षणासाठी देहावर कपडे पाहिजेत. पण देहावर कपड्यांचे फार ओझे घातलें तर देह भागेल व अंतःकरण दडपून जाईल. त्याप्रमाणे भाषेवर फार अलंकार- उत्तम पोशाख आपण जर घातला तर अर्थाचा जीव घाबरा होतो. रानडे गोपाळरावांस सांगत कीं 'There must be vigour in thought, not in language.' पहिल्या पहिल्यानें गोपाळराव बोजड लिहीत. हळूहळू त्यांत सुधारणा होत गेली. त्याप्रमाणें कडक भाषा वापरण्याऐवजीं, भाषा मृदु ठेवून विचार कडक ठेवण्यास ते शिकू लागले, शब्द हें टरफल आहे; आंतला दाणा भरदार पाहिजे. शब्द हा शिंपला आहे; आंतील मोतीं घोसदार पाहिजे. टरफलाकडे आणि शिंपल्याकडे आपण लक्ष देत नाहीं; मोतीं आणि दाणा यांस जवळ करितों. हें तत्त्व रानड्यांनी गोपाळरावांस शिकविलें. त्याप्रमाणेंच जें कांहीं आपणांस लिहावयाचें वा बोलावयाचें तें मुद्देसूद, सत्याला धरून लिहावयाचें आणि जबाबदारीनें काम पार पडावयाचें. ज्या गोष्टीवर बोलावयाचे त्या गोष्टीची खडान्खडा माहिती करून घेऊन मग जीभ सैल सोडावयाची. रामकृष्ण परमहंस कलकत्त्यांतील धर्मोपदेशकांस म्हणत "तुम्हीं परमेश्वर पाहिला आहे कां? त्याचा संदेश तुम्हांस मिळाला आहे कां? तसे नसेल तर हा उपदेश करण्यास तुम्ही नालायक आहां." 'तुम्ही राजकारणाचा अभ्यास, मनन, निदिध्यास केला आहे कां? जमाबंदीचा विचार केला आहे कां? देशांतील रेल्वे, पाटबंधारे, दुष्काळाचीं कामें यांची साग्र माहिती करून घेतली आहे कां? जर असेल तर लिहा, तरच बोला' असेंच रानड्याचेही सांगणें असे. 'उचलली जीभ लावली