Jump to content

पान:ना. गोखले चरित्र.pdf/५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२४
सोसायटींत मतभेदाच्या वादळास सुरुवात.

कीड लागत चालली. दोन भांडीं एकत्र आलीं कीं त्यांचा आवाज व्हावयाचा. दोन फांद्या एकावर एक घासल्या तर त्यांतून अग्नि बाहेर पडावयाचा. चार माणसें एकत्र होऊन कांहीं दिवस गुण्या- गोविंदाने रहातांना दिसतात, परंतु अखेर स्फोट व्हावयाचा हें निदान आम्हां लोकांत तरी ठरलेलेच आहे. 'आरंभशूराः खलु दाक्षिणात्याः' नाना प्रकारच्या कल्पना आम्ही पुढे मांडू- त्या पार पाडण्यासाठी कंबर बांधू, परंतु मध्येच कांहीं तरी विघ्नें उत्पन्न होऊन हे हेतु जागच्या जागी रहातात. या कल्पना बुडबुड्याप्रमाणें विरून जातात. तडीस पोचविणारा एकादाच आमच्यांत निघावयाचा असा लौकिक- दुर्लौकिक- आमचा फारां दिवसांचा आहे. डेक्कन एज्युकेशन सोसायटीचें असेंच होणार अशी चिन्हें दिसूं लागली. वाढत्या चंद्रास आजच ग्रहण लागणार, फोफावणाऱ्या वृक्षास कीड लागणार असें वाटू लागले. प्रथम या संकटाचा उद्भव मतामतांच्या गलबल्यांत झाला. आगरकर व टिळक १८८२ च्या जुलै महिन्यांत कारागृहांत गेले. त्यांचा १०१ दिवस एकत्र सहवास झाला. 'मनुष्य पहावा बसून आणि जमीन पहावी कसून' अशी आपल्यामध्ये एक सुंदर म्हण आहे. आपण जेव्हां मनुष्याच्या जवळ पुष्कळ दिवस रहातों तेव्हांच त्याच्या स्वभावाचें सम्यक् व यथार्थ ज्ञान आपणांस होतें. वरवर होणारे ज्ञान, येतां जातां होणारा बोध हा निर्विकल्प असतो; परंतु आपण त्या मनुष्याच्या सहवासांत वाढूं लागलों कीं, त्याच्या सर्व मतांचें सविकल्पक ज्ञान आपणांस होऊं लागतें. आगरकर व टिळक यांचे कॉलेजमधील वादविवाद आतां तुरुंगाच्या दारांत सुरू झाले. शिक्षणाच्या झिरझिरीत वस्त्राखालीं क्षणभर झांकून गेलेलीं त्यांचीं परस्परविरोधि मतें येथें पुनः स्पष्ट बाहेर येऊ लागली आणि याचा परिणाम असा झाला कीं, ज्या वेळेस हे दोघे नरवीर कारागृहांतून मुक्त झाले त्या वेळेस एकमेकांविरुद्ध मनें होऊन बाहेर पडले.
 कॉलेजमध्ये मधली सुट्टी आली आणि अध्यापक वर्ग एकत्र जमला कीं, वादविवादास सुरुवात होऊन त्यास ऊत यावयाचा. प्रो. भानू यांनी टिळकांच्या आठवणीत याचे हुबेहुब वर्णन केलें आहे. ते म्हणतात