Jump to content

पान:ना. गोखले चरित्र.pdf/५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२३
गोखल्यांचें अंकगणित.

वाटत असतें, परंतु गोपाळरावांचे तसें नव्हतें. तसेंच जेथें जेथें संदर्भ असेल– विशेषतः ऐतिहासिक संदर्भ- तेथें तेथें तो स्पष्ट करावयाचा, यामुळे त्यांची शिकवणूक परीक्षेसाठी जास्त उपयोगाची नसे. तसेच वाङ्मयाबद्दल मनांत प्रेम किंवा भक्ति उत्पन्न करणें गोखल्यांस शक्य नसे. तें काम केळकरांनीच करावें; असो. १८८६-८७ मध्ये गोपाळरावांनी दुसरा एक उद्योग आरंभिला होता. शाळांमधून उपयोग व्हावा म्हणून ते अंकगणितावर एक इंग्रजी पुस्तक लिहीत होते. तें पुरें झाल्यावर त्या त्या विषयांतील पंडितांना त्यांनीं दाखविलें. टिळकांची गणितांत मति सूक्ष्म व दांडगी. त्यांनी हें पुस्तक छापवा असें उत्तेजन दिलें. गोखले फक्त २१ वर्षांचे होते. त्यांस आनंद झाला व तें पुस्तक प्रसिद्ध झालें. प्रथम तें पुस्तक रहाळकर आणि मंडळी यांच्याकडे दिलें होतें. पुढें तें मॅकमिलन् कंपनीकडे जाऊन या उपयुक्त पुस्तकाचा हिंदुस्थानभर प्रसार झाला. दरमहा १२५ रुपये या पुस्तकाबद्दल मॅकमिलन् कंपनीकडून त्यांस पुढे मिळत असत. हें एक त्यांस कायमचें उत्पन्न झालें. त्यांच्या पाठीमागे त्यांच्या मुलीस तें मिळतें. नुकतीच या पुस्तकाची सुधारून वाढविलेली आवृत्ति प्रो. नाईक यांच्याकडून मॅकमिलन् कंपनीनें प्रसिद्ध केली आहे.
 चांगल्या गोष्टीस लवकरच दृष्ट लागते. लहान मुलाला न्हाऊं माखूं घालून आई त्याच्या पाणीदार डोळ्यांस काजळ लावते. तो सुंदर दिसूं लागतो. आईला वाटतें, माझ्या सोनुल्यावर दृष्ट पडेल; आणि ती त्यास गालबोट लाविते. डेक्कन एज्युकेशन सोसायटी भरभराटत चालली होती. चिपळूणकर जरी गेले तरी त्यांच्या पाठीमागें, टिळक, आगरकर, आपटे, गोळे, धारप, नामजोशी, गोखले, भानू-यांसारख्या विद्वानांनीं संस्था अल्पावकाशांतच नांवारूपास आणिली. संस्थेचें कॉलेज निघून तें आतां सर्व विषय शिकविण्यास समर्थ झालें होतें. संस्थेचें पैशाचें काम नामजोशी करीत होते. लोकांचा संस्थेवर लोभ जडला. पुण्यास संस्था भूषणभूत झाली. न्यू इंग्लिश स्कूलसारखी शाळा हिंदुस्थानांत अन्यत्र क्वचितच असेल असे शेरेबुकांत शाळा पाहणाऱ्या अधिकाऱ्यांनी लिहून ठेविलें. परंतु सर्व काळ सारखाच नसतो. या जोमाने वाढणाऱ्या रोप्याला