Jump to content

पान:ना. गोखले चरित्र.pdf/५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२२
प्रो. गोखले व प्रो. केळकर- तुलना.

सांगत. कोणतेही काम अंगावर पडले म्हणजे तें कायावाचामनानें करणें हे आपले कर्तव्य आहे असें समजणारे लोक थोडेच असतात. कामाची वेठ मारणारेच पुष्कळ; परंतु गोपाळरावांचे हे ब्रीद नव्हतें. मुलांस ते मनापासून शिकवीत शिकविण्यासाठीं घरी तयारी करीत. त्यांचा सकाळचा ७॥ ते १०॥ हा वेळ घरी सिद्धता करण्यांत जात असे. आपली. जबाबदारी ओळखून काम करणारे असे मेहनती शिक्षक विरळा. परंतु उत्तम शिक्षक सर्वांसच होतां येत नाही. सर्व विषय सारख्याच मनोरंजकतेनें शिकविणें एकाद्यासच साधतें. गोपाळराव जरी इंग्रजी शिकवितांना पुष्कळ मेहनत घेत तरी मुलांच्या मनावर विषय उत्तम रीतीनें त्यांस ठसवितां येत नसे. आगरकर न्यायासारखाच बुद्धि आणि तर्कप्रधान विषय सुद्धां रसाळ करून सांगत. टिळकांना गणितांतील तत्त्वें विद्यार्थ्यास सहज पटतील अशा रीतीने सांगतां येत. तसे गोपाळरावांचे इंग्रजीविषयीं नव्हतें. ते सफाईदार व भरभर न अडखळतां बोलत. परंतु वाङ्मय शिकवितांना जी एक प्रकारची सहृदयता लागते ती व ग्रंथकाराचे मनोगताशी समरस होतां येण्याची कला हीं गोपाळरावांत नव्हती. केळकर हे इंग्रजीचे त्यावेळचे नामांकित शिक्षक. ते इंग्रजी विषय इतका उत्कृष्टपणें व सहजपणें विशद करीत की, मुलें डोलू लागत. एकाद्या दृष्टांतानेंच ग्रंथकाराचे हृद्गत ते मुलांस समजावून देत, व एकादी मार्मिक कोटि करून मुलांचीं मनें उचंबळवून सोडीत. विषयाशी शिक्षक तन्मय व्हावा लागतो, आणि मगच सहजोद्गार त्याच्या मुखावाटे बाहेर पडूं लागतात. प्रो. केळकरांसारखे शिक्षक खुद्द इंग्लिशांतही थोडेच मिळतील असा त्यांचा लौकिक होता. परंतु अवघड भागावरच केळकर वेळ दवडावयाचे; सोपा भाग आला कीं, तासास तीनतीनशे कवितेच्या ओळी व्हावयाच्या. गोखले असें कधीं करीत नसत. त्यांचे काम प्रमाणशुद्ध आणि नेमस्त. टंगळमंगळ कशांतही नाहीं. अगदी सोपा भाग आला तरी तोही विवरण करावयाचा. सर्वच भाग त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा. हें महत्त्वाचें वाक्य, खुणा करा वगैरे ते सांगावयाचे नाहीत. विद्यार्थ्यांना वाटावयाचें, सर्वच परीक्षेस करावयाचें कीं काय? परीक्षेसाठीं अमुक अमुक मुद्दाम वाचा असे आपणांस शिक्षक सांगतील तर बरें असें विद्यार्थ्यांस