Jump to content

पान:ना. गोखले चरित्र.pdf/५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१८
शिका हो भाऊजी.

जावें व आय्. सी. एस्. होऊन यावें, कारण त्यांचें अद्याप शिकण्याचे वय होतें. परंतु या गोष्टीस पैशाची जोड अवश्य पाहिजे, एंजिनिअर झालें तर? कां वकीलच व्हावें? असे अनेक विचार त्यांच्या मनांत घोळत होते, पण निश्चय होत नव्हता. अखेर ते इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जाऊं लागले. परंतु इतक्यांत पुण्यास ज्यूरिस्प्रूडन्सचा वर्ग उघडण्यांत आला. तेव्हां कॉलेज सोडून देऊन ते या क्लासांत जाऊं लागले. आणि न्यू इंग्लिश स्कूलमध्ये त्यांनीं दरमहा ३५ रुपयांची नौकरी धरिली. याशिवाय त्यांचे दुसरे एक मित्र आणि ते दोघांनी मिळून पब्लिक सर्व्हिसचा एक क्लास काढिला. या क्लासामुळे त्यास ३०-३५ रुपये प्राप्ति होत असे. स्वतःसाठी पंधरा वीस रुपये खर्च करून बाकी उरलेले सर्व पैसे ते आपल्या भावाकडे पाठवीत. गोविंदरावांनी किती कष्ट करून आपली विद्या शेवटास नेली हें गोपाळराव जाणून असत. शिवाय वहिनीची प्रेमळ मूर्तिही त्यांच्या डोळ्यांसमोर उभी रहात असे. 'पुरे झाले तुझें शिकणें; आतां कोठें तरी नौकरी करून संसारास मदत करूं लाग' असें जर कधीं गोविंदराव बोलले तर ती माउली म्हणावयाची 'शिका हो भाऊजी तुम्ही; माझें किडुक मिडुक मोडून देईन. तुम्ही आपली शिकण्याची हौस पुरी करून घ्या.' आपल्या वहिनीला पुन्हा तिचे अलंकार मिळावे ही त्यांची इच्छा होती. या सदिच्छेनें जेवढे म्हणून पैसे उरत तेवढे ते वहिनीला पाठवून देत.
 गोपाळराव शाळेत इंग्रजी शिकवीत. पांचव्या इयत्तेला ग्रे कवीचें जगन्मान्य श्मशानगीत शिकवितांना 'किती सुंदर विचार, किती गंभीर भाषा' असे उद्वार ते काढावयाचे. पांचव्या इयत्तेतील मुलांना तें समजत नसे. ते मनापासून शिकवीत परंतु मुलांना तें कठिण वाटे. ते घरींही इंग्रजीचा जोरानें अभ्यास करीत. इंग्रजी भाषा आपलीशी करावी ही त्यांची महत्त्वाकांक्षा. कोठें उत्तम विचार, उत्तम वाक्य दिसलें कीं, गोपाळरावांनीं तें आत्मसात् केलेच. वर्तमानपत्रांचाही त्यांस नाद लागला. त्यांतील इंग्लिश उतारे ते पाठ करीत आणि पुढे पुढे त्यांनीं एकदां वाचलें कीं, त्यांच्या लक्षांत राही. टिळक-आगरकरांच्या सहवासानें ते केसरीत वर्तमानसार देत. पुढे १८८६-८७ साली मराठ्याच्या