Jump to content

पान:ना. गोखले चरित्र.pdf/५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१९
अध्यापक गोखले.

अंकांत ते लिहू लागले. त्यांचा स्वभावतःच इंग्रजीकडे ओढा असे. ते इंग्रजी उत्तम लिहीत, प्रथम प्रथम त्यांत शब्दावडंबर असे. 'General war in Europe' ही त्यांची लेखमाला लोकप्रिय झाली होती असें सांगतात.

अध्यापन-काल.


 परंतु अद्याप गोपाळारावांचे ध्येय निश्चित झालें नव्हतें. त्यांची ज्यूरिस्प्रूडन्सची परीक्षा उतरली. १८८६ सालीं ते व वासुदेवराव केळकर फक्त वर्गाच्या दिवशी मुंबईस जात; हजिरी पुण्यास राहूनच ते भरीत. आपण नामांकित, फर्डे इंग्लिश बोलणारा वकील व्हावे हीच त्यांच्या मनांतली इच्छा दिसते. परंतु देवाची इच्छा दुसरीच होती. त्याचे विचार कोणास आकळतां येतात? गोपाळरावांच्या हातून सर्व देशाची वकिली व्हावयाची होती. ते टिळक-आगरकरांच्या सहवासांत होते. विशेषतः आगरकरांच्या मध्ये आणि त्यांच्या मध्ये साम्य होतें. कष्टदशेतून, दारिद्र्याच्या पंकांतून आगरकररूपी सुंदर कमल देशास लाभलें होतें. गोपाळरावांची स्थितिही गरीबीचीच होती. आगरकरांनी पैशाचा व सरकारी मानमरातबाचा मार्ग झिडकारून जनसेवेस वाहून घेतलें या गोष्टीचा न कळत परिणाम गोपाळरावांच्या गुणग्राही अंतःकरणावर झाल्याशिवाय राहिला नसेल. आमरण गरीबांतच जन्म कंठून अध्यापक-वृत्तीनें पुरातन ऋषींप्रमाणे व्रताचरण करावयाचे हा आगरकरांचा उज्ज्वल मार्ग अनुसरण्याची अंधुक स्फूर्ति त्यांस झाली असेल. आगरकरांचें अकपट वर्तन, निर्व्याजमनोहर उदार स्वभाव, कुटिल विचारांची चीड, पतित व अज्ञानांधःकारांत पडलेल्यांचा उद्धार करण्याची तळमळ, मनाची धीरता, शिव्याशापांस न जुमानतां आपला दृढ निश्चय राखण्याचा बाणा या सर्व गुणांचा गोखल्यांच्या कोमल मनावर कांहींच परिणाम झाला नसेल कां? टिळक, आगरकर अत्यंत बुद्धिमान्– परंतु त्यांनीं आपलें बुद्धिवैभव देशास वाहिलें. तोच घडा आपण गिरवावा, असे विचार त्यांच्या मनांत येऊं लागले असतील; परंतु अद्याप गोपाळरावांस महत्त्वाकांक्षा होती. आपण