Jump to content

पान:ना. गोखले चरित्र.pdf/४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१७
गोपाळाची स्त्रीभूमिका.

गरीब असल्यामुळे त्यास स्वतः खिशांतून पैसा काढून देणें अशक्य होतें. त्यानें या नाहीं त्या हातानें मदत करावी म्हणून नाटकांत स्त्रीची भूमिका केली होती. ज्या टिळक-आगरकरांजवळ त्यास पुढे जावयाचें होतें, त्यांची ही अशी प्रस्तावना आहे.
 १८८२ चे अखेरीस गोपाळाची परीक्षा झाली आणि तो तीमध्ये यशस्वी झाला. कोल्हापुरास त्यावेळीं बी. ए. चा वर्ग नव्हता म्हणून गोपाळ डेक्कन कॉलेजमध्ये शिकण्यास गेला. परंतु लवकरच खुद्द कोल्हापुरास हा वर्ग निघाल्यामुळे दुसऱ्या टर्मला गोपाळ पुनः कोल्हापुरास आला. या वेळेस गोपाळच्या अभ्यासक्रमांत विख्यात एडमंड बर्कचें जगत्प्रसिद्ध 'फ्रेंच क्रांतीवरील विचार' हें पुस्तक नेमलेलें होते. बर्कची गंभीर आणि भारदस्त विचारसरणी व तदनुरूप सुंदर भाषा या रमणीय योगानें हें पुस्तक लोकोत्तर झालें आहे. या पुस्तकावर 'पेन'ने टीकाही केली आहे. राजकीय तत्त्वज्ञानावरचे हे ग्रंथ गोपाळास नीट अभ्यासावे लागले हें फार चांगले झाले. ज्याचा पुढील जन्म राजकीय झगड्यांत जावयाचा होता त्याला प्रथमतःच ही पुस्तकें शिकावी लागलीं हा एक योगायोगच म्हणावयाचा. नेहमींच्या पद्धतीप्रमाणें गोपाळानें यांतील उत्तमोत्तम उतारे पाठ केले, आणि आपल्या स्मृति-पटलावर कायमचे खोदून ठेविले. १८८३ मध्ये गोपाळ पहिली बी. ए. ची परीक्षा पास झाला. दुसऱ्या बी. ए. मध्यें तो ऐच्छिक विषय गणित घेणार होता, आणि यासाठीं त्यास मुंबईस जाणें इष्ट वाटलें. १८८४ च्या जानेवारीमध्यें तो मुंबईस दाखल झाला. या वर्षी त्याची शेवटची परीक्षा होती. हॅथॉन्वेंट हे एक नामांकित शिक्षक होते. येथे धोंडोपंत कर्वे हे त्याचे सहाध्यायी होते. गोपाळ हा हॅथॉन्वेंट साहेबांचा एक आवडता शिष्य होता येवढेच कळते. बी. ए. ची परीक्षा गोपाळराव दुसऱ्या वर्गात पास झाले. त्यांस आनंद झाला. संकल्प केल्याप्रमाणे आतांपर्यंतचा पल्ला निर्वेधपणें गांठला. यावेळी त्यांचे वय फक्त १८ वर्षाचें होतें. अजूनही आपण शिकावें असें त्यांस वाटण्याचे दिवस होते व त्यांस तसे वाटतही होतें. देशभक्तीचा उमाळा अद्याप आला नव्हता. व्यापक विचार हृदयाकाशांत डोकावूं लागले नव्हते. त्यांस क्वचित् वाटे कीं, विलायतेस
 २ - गो. च.