Jump to content

पान:ना. गोखले चरित्र.pdf/४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१३
यत्नदेव गोपाळ.

होण्याची स्फूर्ति होते. कधीं न्यूटन हृदयांत घुसतो तर कधीं रस्किन किंवा कार्लाइल डोळ्यांपुढून हलत नाहीं. हे संक्रमणाचे दिवस असतात. मनाचा आखाडा येथे असतो. त्यांत मन पुष्ट होत असतें. त्याप्रमाणेंच कॉलेजमधील मोकळे वातावरण, वादविवादोत्तेजक सभा, जिमखाना, लायब्ररी, वाचनालय यांची सर्व व्यवस्था मुलेंच करितात. मुलांमुलांच्या दाट व जन्माच्या ओळखी येथे पडतात. गोपाळरावांचे सहाध्यायी प्रो. विजापुरकर हे होते. हे गोखल्यांचे मित्र होते. गोखल्यांच्या गुप्त गोष्टी पुढें विजापुरकरांजवळ उघड होत असत. हा कॉलेजचा आयुष्यक्रम गोपाळास लाभला हें त्याचें व म्हणून आम्हां सर्वांचें भाग्य होय. नाही तर परिस्थितीमुळे मोठ्या होतकरू मंडळींसही जसे कारकुनीच्या रामरगाड्यांत भरडलें जावें लागतें तशीच स्थिति याही मोहऱ्याची झाली असती.
 गोपाळ हा कांहीं अलौकिक बुद्धीचा मनुष्य नव्हता, किंवा अगदीं 'ढ' ही नव्हता. या जगाच्या रंगणांत असेच पुरुष जास्त दिसतात. ज्यांच्या जवळ लोकोत्तर बुद्धिमत्ता असते ते घमेंडीत जातात प्राणि प्रयत्न करीतनासे होतात. उत्तम तलवार जवळ असून तिचा उपयोग न केल्यामुळे ती गंजून जाऊन निरुपयोगी मात्र होते. जे 'ढ' असतात ते म्हणतात आम्हीं प्रयत्न केला तरी विफळच होणार. मग कशास करा? परंतु जे मध्यम स्थितीचे असतात त्यांस आंतून भरंवसा वाटतो कीं, जर आपण हातपाय हलवले, जर आपण यत्नांची सीमा केली, तर यशःशिखर आपणांस गांठतां येईल. टिळकांनी न्यू पूना कॉलेजमध्ये १९१९ मध्ये हेच उद्गार काढले होते. मध्यम स्थितींतील माणूस यत्नवादी असतो. ठोठावले तर उघडेल ही धमक त्याला असते. तो हुरळून जात नाहीं किंवा होरपळून जात नाहीं. तर वस्तुस्थितीचें पर्यालोचन करून 'यत्नदेवो भव' हें सूत्र पुढें ठेवितो. गोपाळ या मध्यम वर्गातील होता. आपला पाठ नीट तयार करण्यांत जे कधीं कसूर करीत नाहींत, त्यांसच परीक्षेत यश येतें. गोपाळाचा अभ्यास तयार असे. त्याची पाठशक्ति दांडगी होती, आणि या पाठशक्तीचे अजब चमत्कार तो करून दाखवीत असे. त्यास अभ्यासास नेमलेलें इंग्लिश काव्य तोंडपाठ येत असे. त्याचे