Jump to content

पान:ना. गोखले चरित्र.pdf/४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१२
गोपाळचें उच्च शिक्षण.

आपण उनाडलों नाहीं आणि असें कां बरें झालें? सर्व श्रम वायां गेले. मन खट्टू होऊन गोपाळ एकटाच लांब दूर फिरावयास गेला. परंतु लवकरच त्यास वाटेंत तार आल्याचे आनंददायक वर्तमान कळलें, गोपाळाचा आनंद गगनांत मावेना. भावनावश माणसाला आनंदही जास्त होतो, दुःखही जास्त होते. आपल्या भावनांस ताब्यांत ठेवण्यास गोपाळ पुढें न्या. रानड्यांच्या उदाहरणानें शिकला. परीक्षा पास होण्याचा आनंद पास होणारेच जाणतात. वर्षाच्या श्रमांचा मोबदला एका क्षणांत मिळावयाचा असतो. केलेल्या श्रमांचें सार्थक होऊन जो आनंद- सात्विक आनंद भोगावयास मिळतो तो अमोल आहे. मनाला नवीन कार्य करण्यास हुरूप येतो. 'क्लेशः फलेन हि पुनर्नवतां विधत्ते' हेच खरें.
 मॅट्रिकची परीक्षा झाली त्यावेळी गोपाळ फक्त पंधरा वर्षांचा होता. त्यानें आपला धरलेला मार्ग तडीस न्यावा असें ठरलें आणि गोपाळ पुढील अभ्यासासाठी कोल्हापुरास राजाराम कॉलेजांत दाखल झाला. कॉलेजमधील आयुःक्रम आणि शाळेतील आयुःक्रम यांत जमीनअस्मानाचा फरक असतो. शाळेमध्ये गुरुजी मुलाची प्रत्यक्ष चौकशी करितात. विद्यार्थ्याच्या प्रगतीकडे लक्ष देतात. प्रत्येकास समजलें न समजलें. विचारून सर्व स्पष्ट करितात. शाळेमध्ये अभ्यासाव्यतिरिक्त मुलगा विशेष कांही पहात नाहीं आणि शिक्षकांची साधारण शिकवणूक संकुचितच असते. कॉलेजमध्ये विद्यार्थ्याच्या अंगावर सर्व जबाबदारी पडते. प्रोफेसर वर्गांत विषय विशद करून निघून जातात. तदनुरोधानें विद्यार्थ्यास विषय घरी तयार करावा लागतो. प्रोफेसरांची शिकविण्याची पद्धतिही व्यापक असते. कोणताही विषय सांगोपांग त्यांस शिकवावयाचा असतो. नाना प्रकारचे दृष्टान्त, नाना नवलकथा ते सांगतात. ते टीका करितात. चांगले व वाईट यांची फोड करितात. रोज निरनिराळ्या व्यक्ति, निरनिराळी पुस्तकें कानावरून जातात. आज नेपोलियनने मनास वेडें करावें तर दुसऱ्या वेळेस बायरननें चटका लावावा. आज इंग्लंडचा इतिहास आवडावा तर परवां इटलीच्या उद्धारकांचें कौतुक करावेसे वाटावें. (आ)पल्याही मनांत महत्त्वाकांक्षा डोकावू लागते. आज मोठे भीमासारखें व्हावेसें वाटतें. तर दुसऱ्या दिवशी शंकराचार्यासारखे तत्त्वज्ञ