Jump to content

पान:ना. गोखले चरित्र.pdf/४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
वडील बंधूंचा स्वार्थत्याग.

हे कठोर वाटतें. कर्ता माणूस मृत्युमुखीं पडला असतां घरांतील इतर मंडळीची जी दुःखप्रद व अनुकंपनीय स्थिति होते तीच या भावांची झाली. गोपाळाची आई अंताजीपंतांकडे गेली आणि गोपाळाच्या वडील भावास नौकरी शोधावी लागली. शिक्षणाची कायमची रजा गोविंदास घेणे भाग पडलें, परिस्थितीला तोंड देणें जरूर होतें आणि तें धैर्यानें व निःस्वार्थ बुद्धीनें गोविंदानें दिलेंही. चुलत्याकडे आई गेली होती, परंतु ती पुनः लवकरच परत आली. कागल संस्थानचे अधिकारी रावसाहेब विष्णु परशुराम वैद्य यांच्या मध्यस्थीनें गोविंदास कारकुनीची जागा मिळाली. या वेळेस गोविंदाचें वय अठरा वर्षांचें होतें आणि गोपाळ तेरा वर्षांचा होता. सेवाधर्माचा भुंगा गोविंदास लावून घेणें भाग पडलें, परंतु कुटुंबाच्या पोषणासाठीं व आपल्या भावाच्या शिक्षणासाठी त्यास तसे करणें प्राप्त होतें. आपले शिक्षण पुरें झालें नाहीं तरी आपल्या भावाचे शिक्षण पुरें व्हावें ही सदिच्छा त्यांच्या अंतरंगी वसत होती. या रोपट्यास आज पाणी घातलें तर त्याचा वृक्ष होऊन त्याच्या शीतल छायेंत आपणास बसावयास मिळेल आणि आपले पांग गोपाळ फेडील या भावी आशेनें आज गोपाळासाठी ते झीज सोशीत होते. परंतु हें कार्य करण्यांत गोविंदराव हे अनपेक्षित रीतीनें देशावर महदुकार करीत होते. हा वृक्ष त्यांनाच- सुखविणार नव्हता तर नोकरशाहीनें संतापविलेल्या आपल्या देशबांधवां सही शांतविणार होता. असो.
 गोपाळाच्या शिक्षणासाठीं ते दरमहा १० रुपये पाठवीत असत. कारकुनाचा पगार तो केवढा असणार आणि त्यांत संस्थान! परंतु गोविंदरावांनी आपल्या भावाची आबाळ होऊ दिली नाहीं. स्वतःच्या पोटास त्यांनी वेळ वखत चिमटा घेतला, परंतु गोपाळाचे अडूं दिलें नाहीं. गोपाळानेही आपल्या भावाच्या पैशाचे चीज केलें. उधळपट्टी ही त्याला माहीतच नव्हती. हल्ली आपण याच्या विपरीत देखावे किती तरी पाहतों. मुलाच्या भावी वैभवाच्या मनोराज्यांत दंग होऊन बाप मुलाला पैसे पाठवीत असतो. स्वतः ढोंपरपंचा नेसून हाडाची काडे करून मुलाच्या गरजा भागवितो, परंतु बापाकडे बेट्याचें लक्ष असतें काय? ऐट करावी, कपड्याच्या झोकांत असावें, सुंदरशी यष्टि हस्तक-