मलांत धारण करावी, आणि सिनेमा, नाटकगृहें यांस आपल्या पदधूलीनें पावन करावें हा याचा स्तुत्य कार्यक्रम असतो! कोटबुटांत पैसा उडतो आणि बापास व बेट्यास अंतीं कपाळास हात लावावा लागतो! गोपाळाची वागणूक चोख. सत्याचा अपलाप मरण आलें तरी गोपाळ करावयाचा नाहीं. या गुणाचा गोपाळास भावि आयुष्यांत उपयोग झाला. या बोटावरची थुंकी त्या बोटावर करून वेळ मारून नेतां आली असती असे प्रसंग पुढील जीवनक्रमांत त्याच्यावर आले. परंतु त्यानें सत्त्यालाच श्रेष्ठ मानलें, सत्याचेंच सिंहासन बसावयास पसंत केलें. आपला भाऊ आपणास किती दगदगीने मिळवून पैसे पाठवितो याची जाणीव त्याच्या कर्तव्योन्मुख मनांत सदैव जागृत असे. तो भावास दरमहा हिशोब पाठवीत असे.
परंतु गरीबीनें दिवस काढीत असतांनाही त्यानें स्वाभिमान सोडला नाहीं. कोणाजवळ याचना केली नाहीं. कोणाची खुशामत केली नाहीं. स्वाभिमान त्याने कसा राखिला याची एक गोष्ट येथे देतों. गोपाळ खानावळीत जात असे. एकदां त्यानें सहज वाढप्याजवळ दहीं मागितलें, तो म्हणाला 'महिना आठ आणे जास्त द्यावे लागतील. उगीच नाहीं फुकट दहीं मिळत!' 'मला रोज दहीं वाढीत जा' असें गोपाळानें सांगितले. अर्थात् आठ आणे जास्त द्यावे लागणार ते कोठून आणावयाचे? ठरीव पैशांत तर उरकलें पाहिजे. स्वाभिमान आणि आपली मिळकत यांची संगति राहील अशी त्यानें युक्ति काढिली. खानावळींत खाडे पडावे म्हणून दर शनिवारी तो उपास करूं लागला. अशा प्रकारें आपला मान त्यानें राखून घेतला. गैरवाजवी खर्च चुकीमुळे जरी झाला तरी तो आपल्या भावास लिहावयास त्यास भीति वाटे. आपण अनाठायीं खर्च करतों हें पाहून आपला भाऊ काय बरें म्हणेल? तो तिकडे मोठ्या मिनतवारीनें दिवस काढीत असतां आपण असा खर्च कसा केला असें त्यास वाटे. अर्थातच तो अपव्यय कधीं करीतच नसे. परंतु एकदां एक चमत्कारिक गोष्ट घडून आली. त्याच्या एका स्नेह्यानें त्यास तो नको नको म्हणत असतां नाटकास नेलें होता होईतों कोणाचें मन मोडावयाचें नाहीं हा गोपाळाचा स्वभाव. तो नाटकास गेला. त्याचे तिकीट त्याच्या मित्रानंच काढले.
पान:ना. गोखले चरित्र.pdf/४२
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१०
मानधन गोपाळ.