कुल अशा या साध्वीनें आपल्या पतीचें नेसावयाचें एक धोतर मरेपर्यंत आपणाजवळ ठेविलें होतें. कृष्णरावांस या पत्नीच्या सहवासानें सुख झाले. त्यांचीही नौकरी अत्यंत नेकीची. त्यांचा बाणेदारपणा पाहून त्यांच्या वरचे अधिकारी त्यांचे कौतुकच करीत. त्यांच्या गुणांमुळे त्यांची बढती झाली व ते फौजदार झाले. त्यांचा बहुतेक काळ कागल येथे संसार करण्यांत गेला.
शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी।
तुकाराम.
रत्नागिरी जिल्हा हा अन्वर्थक आहे. खरोखरच त्याने अनेक रत्ने गेल्या शतकांत आपणांस दिली. न्या. रानडे, लो. टिळक, भारत—सेवक गोखले, गणित—विशारद प्रि. परांजपे, कर्मवीर कर्वे यांच्या सारखे सर्व महाराष्ट्रास किंबहुना हिंदुस्थानास ललामभूत झालेले थोर पुरुष आपणांस रत्नागिरीनेंच दिले. गोपाळ कृष्ण गोखले यांचा जन्म ९ मे १८६६ रोजी कोतळूक मुक्कामी झाला. सत्यभामाबाई या वेळेस माहेरीं बाळंतपणासाठी गेल्या होत्या. माहेरीं दोन तीन महिने झाल्यावर बाळबाळंतीण ताह्मनमळ्यास आली. तेथे दोन तीन महिने सत्यभामाबाई होत्या. कोंकणांतील निसर्गाच्या मांडीवर गोपाळ खेळत होता— लोळत होता. कोंकणच्या हवेचा शुद्धपणा त्याच्या रोमरोमांत भरत होता. कोंकणांतील डोंगरांची भव्यता त्याच्या अजाण हृदयावर परिणाम करीत होती. आई आपल्या तान्ह्या बाळासह लवकरच कागलास आपल्या पतीकडे आली.
गोपाळाचा वडील भाऊ गोविंद. तो शाळेत जात असे. गोपाळही मोठा झाल्यावर शाळेत जाऊं लागला. त्याच्या बुद्धिमत्तेच्या गोष्टी ऐकिवात नाहींत. परंतु त्याच्या मनाची प्रामाणिकता तेव्हांही होती. एके दिवशीं गुरुजींनीं घराहून गणित करून आणण्यास सांगितलें होते. वर्गात फक्त गोपाळाचे गणित बरोबर! गुरुजींनीं त्यास शाबासकी