Jump to content

पान:ना. गोखले चरित्र.pdf/३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
उपोद्घात.

करूं या आत्मप्रत्ययानें, कामास लागा. देशाची सध्यांची स्थिति ही सत्वपरीक्षा आहे. या सत्त्वपरीक्षेत सोज्ज्वलपणे आपण उत्तीर्ण झाले पाहिजे. श्रियाळशैव्यांचे आपण वंशज, ज्ञानेश्वर- नामदेवांचे वारसदार आहों. आपण डगमगून चालणार नाहीं, आणि उतावीळपणाने अहितकारक गोष्ट करतां कामा नये. वाइटांतून चांगले बाहेर पडतें. आपली परकीयांशीं गांठ पडली यांत परमेश्वरी सूत्र आहे; कांहीं तरी हेतु आहे. नवीन प्रकाश आपणांस मिळावा, नवीन दृष्टि आपणांस यावी म्हणून ही ईश्वरी घटना आहे. तो प्रकाश आपलासा करूं या. धीर सोडतां कामा नये. धीर कोण सोडतो? ज्याला कांहीं करावयाचें नसतें तो. आपण सर्व बाजूंनी उचल केली पाहिजे. सर्व बाजूंनीं खुंटया मारीत जाऊन जागा व्यापून टाकिली पाहिजे. हा धडा ज्यानें राष्ट्रास शिकविला, निराश झालेल्यांस आशेचा घोट पाजला— किरण दाखविला, विगलित व हतबल झालेल्यांस हात देऊन उठण्यास लाविलें, मृतांस चैतन्य दिलें, सचेतनांस स्फूर्ति दिली, स्फूर्तियुक्तांस कृति करावयास लाविलें, त्या न्या. रानड्यांचे देशावर किती उपकार आहेत तें सांगतां येत नाहीं. त्यांचेच उदाहरण हरहमेश डोळ्यांसमोर ठेवून, त्यांची शिकवणूक हृदयांत ठसवून, मुरवून, ज्यांनीं आपला सर्व जन्म मायभूमीच्या उद्धारासाठी खर्च केला, सुखाची कांस धरिली नाहीं, दुःखाची पर्वा केली नाहीं, जे स्तुतीनें मोहित झाले नाहींत, ज्यांनीं निंदेमुळें प्रारब्ध कार्य सोडून दिलें नाहीं, दुसऱ्याच्या अंतरास ढका न लावता, परंतु स्वकर्तव्य न सोडतां ज्यांनीं जनता- जनार्दनाची आमरण सेवा केली त्या चिरंजीव भारतसेवक गोपाळराव गोखल्यांची आयुष्य-कथा पुढील लेखांत निरूपण करावयाची आहे. या कथेला सर्वांच्या लिखाणांचा आधार घेतला आहे. मनोरंजन अंक, अभ्यंकर- चरित्र, फर्ग्युसन कॉलेज त्रैमासिक, वाच्छांनीं लिहिलेल्या आठवणी, केसरीतील लेख, गोखल्यांचे लेख व व्याख्याने या सर्वांचा आधार घेतला आहे. याशिवाय श्री. मोदी यांनी लिहिलेल्या सर. के. मेथा यांच्या चरित्रांतील माहिती, मॉडर्न रिव्ह्यू, इंडियन रिव्ह्यू यांचाही ठिकठिकाणीं उपयोग केला आहे. त्या सर्वांचा प्रस्तुत लेखक ऋणी आहे.