Jump to content

पान:ना. गोखले चरित्र.pdf/२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२२

उदाहरण घ्या. आपणांस तें भूपेद्रबाबूंना पत्र लिहिण्याच्या वेळीं पहावयास सांपडलें नव्हतें, असें गोखल्यांनी स्पष्ट म्हटलें होतें. त्यांनी तें वाचलें होतें, असें छातीठोक सांगणारा विश्वसनीय साक्षीदार या वादांत कोणीच पुढे आलेला नसल्याने, गोखल्यांनीं तें टिपण पाहिलें होतें कां नव्हतें, याविषयीं शक्याशक्यतेच्या आनुमानिक आधाराने शुष्क तर्क काढून गोखल्यांना दोष लावणें केव्हांही उचित ठरणार नाहीं. परंतु रा. साने यांनी असल्याच तर्कांत शिरून गोखल्यांवर शिंतोडे उडविले आहेत.
 १९०८ साली टिळकांना राजद्रोहाच्या आरोपावरून शिक्षा झाली तेव्हां गोखले विलायतेस होते. विलायतेस शिक्षेची बातमी पोचल्यावर तेथल्या कित्येक हिंदी रहिवाश्यांनी टिळकांसंबंधीं सहानुभूति व सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी एक सभा भरविली. गोखल्यांनाही पाचारण होतें, परंतु गोखले त्या सभेला गेले नाहींत, या गोष्टीवरून गोखल्यांना टिळकांविषयी कोरडी सहानुभूति देखील दाखविणें योग्य वाटलें नाहीं, अशा अर्थाचें एक विधान जातां जातां रा. साने यांनीं पुस्तकांत घातलें आहे. गोखल्यांच्या प्रस्तुत गैरहजरीवरून याहीपेक्षा जास्त भयंकर तर्क मागें लोक करीत होते. त्याचें प्रत्यंतर १९०८-९ सालांत गणेशोत्सवामध्ये गाइल्या गेलेल्या मेळ्यांच्या पदांमधून जिज्ञासूंना पहावयास सांपडेल. रा. साने यांनीं आपल्या तर्काची धांव भलत्याच थरापर्यंत जाऊं दिली नाहीं; पण गोखल्यांना सहानुभूति नव्हती, हा त्यांचा तर्कसुद्धां वस्तुस्थितीच्या अज्ञानाचा द्योतक आहे. वाटेल त्या सभेत जाऊन भाषणें करावयाचीं नाहींत, असा एक गोखल्यांचा नियम होता. शिवाय ज्या विषयासंबंधी आपण अगाऊ विचार केला नाहीं, त्या विषयावर केवळ लोकाग्रहास्तव ते भाषण करीत नसत. या दोन्ही नियमांबद्दल त्यांची नालस्ती झाल्याची उदाहरणें आहेत. विलायतच्या सभेंतली गैरहजेरी हें एक अशापैकींच उदाहरण आहे. रा. साने यांनी या बाबतीत जास्त माहिती मिळविली असती तर त्यांनीं जो निष्कर्ष सुचविला आहे तो खचित सुचविला नसता. गोखल्यांना टिळकांच्या संबंधांत सरकारनें चालविलेला अन्याय पाहून प्रत्येक वेळीं खेद होत असे व अन्याय दूर होण्यासाठी त्यांनी यथाशक्ति प्रयत्न केल्याची प्रमाणे आहेत. असल्या