प्रत्येकाच्या स्वभावांत कांहीं ना कांहीं तरी वैशिष्ट्य असतें. सद्गुणांचा पुतळा एक परमेश्वरच असून अपूर्ण राहण्यांतच मौज व माणूसपणा आहे. ज्या मनुष्यांत गुण व दोष यांचं संमिश्रण असतें तो जनतेस फार आवडतो. चंद्र हा कलंकामुळे जास्तच खुलतो. गोखल्यांच्या स्वभावात अशीच मौज आहे. त्यांचा मुख्य अवगुण म्हटला म्हणजे तापटपणा, हट्टीपणा. त्यांच्या विरुद्ध कांही झालं की ते संतापत. रानड्यांच्या उदाहरणाने त्यांनी स्वतःचा दुर्गुण घालविण्याचा पुष्कळ प्रयत्न केला परंतु थोड्याबहुत प्रमाणानें तो टिकलाच. त्यांच्या एकाद्या नोकराने जर सोसायटीचे काम वेळच्या वेळी केल नाही तर ते संतापावयाचे आणि त्यास रांगें भरावयाचे. परंतु मागून त्यांचे त्यांनाच वाईट वांटे. आपण त्यास फार बोललो असे वाटून ते त्या गड्यास हांक मारीत आणि म्हणत, 'अरे, काम वेळच्या वेळी करावें; टपालासारखे काम महत्त्वाचे असते. तें तूं केलें नाहींस म्हणून मी रागे भरलो, परंतु असे करूं नको व मनांत फार वाईट वाटू देऊ नको. अभ्यंकरांनी हाच अवगुण सांगितला आहे. गोखल्यांस शांति नव्हती. टीकेच्या व खळबळीच्या वर तरंगणारी ज्यांची मने असतात असे टिळक आगरकरच ही शांतता ठेवू जाणोत. इतरांस तें शक्य नसतें. वाच्छांनी आपल्या आठवणीत हाच दुर्गुण सांगितला आहे. वादविवादांत स्वतःचंच म्हणणे खरं असें त्यांस वाटावयाचे व ते हमरीतुमरीवर यावयाचे, चिडावयाचे. परंतु मागून ते आपली चूक कबूल करीत. पुष्कळ लोकांस आपली चूक कळली तरी ती कबूल करण्यांत कमीपणा वाटतो. परंतु गोखल्यांस असें वाटत नसे आणि खरोखरच स्वतःची चूक कबूल करण्यास मनाचे फारच मोठें धैर्य लागते. गोखल्यांत आणि त्यांच्या शिष्यांत- गांधीमध्यें- हा गुण उत्कटत्वानें वास करीत आहे. वाच्छा म्हणतात- 'He would seize an idea on the impulse of the moment and try to hug it till he found later on by experience that it was a wrong one. If in nine cases the impulse was ingenuous, in the tenth it was altogether