Jump to content

पान:ना. गोखले चरित्र.pdf/१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१२

नाहीं. श्रद्धाबळ हें कांहीं गोपाळरावांचें प्रधानबळ नव्हे आणि म्हणून क्रान्तिदर्शित्वाचा लाभ त्यांस कधीं घडला नाहीं. रानड्यांना तो थोडासा घडला व आपल्या गुरूवरच श्रद्धा ठेवून त्यांजकडून मिळालेल्या श्रद्धेच्या ठेवीवरच गोपाळरावांनीं आपलें काम साधून घेतलें.
 (४) सौजन्य: – शिष्टपणाची वागणूक हा चौथा मोठा गुण गोपाळरावांनी संपादिला होता. लहानपणापासूनच तशी त्यांची प्रवृत्ति होती व पुढे तारुण्यांत, जेव्हां दृष्टि फांकते त्यावेळीही, त्यांनीं आपल्या मनाला आंवरून मर्यादेनें वागणूक केली. त्यामुळे अखेर पावेतों त्यांचे ठिकाणीं सज्जनपणा कायम राहिला. सार्वजनिक आयुष्यक्रमांत बरे वाईट पुष्कळ प्रसंग आले तथापि त्यांनीं निदान स्वतः तरी शिष्टाचाराचा अतिक्रम केलेला दाखवितां येणार नाहीं. मोठया पुढाऱ्यांचे क्षुद्र अनुयायी एकमेकांवर भोंकतात यांत आश्चर्य नाहीं पण त्यापासून खुद्द मोठ्यांनी दूर राहावें लागतें आणि ही मर्यादा गोपाळरावांनी पाळिली होती. त्यांचे गुरु माधवराव हे तर सौजन्यसागर म्हणूनच प्रसिद्ध होते.
 (५) निस्वार्थीपणा- पांचवा गुण गोपाळरावांचा निःस्वार्थीपणा हा सांगतां येण्यासारखा आहे. स्वतःकरितां व कुटुंबीयांकरितां कष्ट करणारी 'कुटुंबकाबाडी' उदंड पडली आहेत. पण देशहितासाठीं आपली काया झिजवून आणि माया खर्चून मागें कीर्ति उरविणारे गोपाळरावांसारखे विरळाच. फकिरी बाण्याचा निस्वार्थीपणा हा त्या गुणाचा कडेलोट होय. कडेलोटाचा मार्ग व्यावहारिकांचा नव्हे. व्यावहारिक हे नेमस्तपणाची मर्यादा संभाळूनच चालणार आणि तेंच धोरण गोपाळरावांनी आचरिलें.
 (६) देशप्रीति - वरील पांचांपेक्षांही हा सहावा गुण एक प्रकारें फार महत्त्वाचा होय. आपला देश सुखी व्हावा ही तळमळ पोटांत गोपाळरावांनी अहोरात्र वागविली होती. त्यांची शुद्ध व सोज्वळ देशप्रीति त्यांचे प्रतिपक्षी*[] यांसही निःसंशय मान्य करावी लागे, अशी प्रखर होती.


  1. संयुक्त प्रांतांत गोपाळराव गोखले यांनीं दौरा काढला त्यावेळीं केसकारांनी त्यांजवर टीका करतांना पुढील उद्गार काढले आहेत त्यावरून आमचे वरील म्हणणें वाचकांस पटेल अशी आमची खात्री आहे.