Jump to content

पान:ना. गोखले चरित्र.pdf/१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
११

आहे. भावना आणि कल्पना यांशिवाय हें जीवित निष्फल आणि निःसार होईल यांत संशय नाहीं. पण कल्पनेचा धर्मच असा आहे कीं, ती नेहेमी जोरजोरानें उशी घेते. जसा जातिवंत मस्त वारू असावा आणि तो चौफेर उधळला म्हणजे त्याची टाप अस्मानांत गेलेली भुईला पुनः केव्हां चिकटली तें दिसतच नाहीं तसेंच कल्पनेचें आहे, कल्पनेचें तारू एकदां भडकलें कीं कोठें जाईल याचा नेम नाहीं; उतरलें तर एकाद्या सुंदर बेटावर उतरेल नाहींपेक्षां खडकावर फुटेल किंवा रेतींत रुतेल! यासाठीं कल्पनेला नेहेमी बांधून चालविली पाहिजे. व्यवहाराच्या जड शृंखळा कल्पनेच्या पायांत घालून तिला नाचविली म्हणजे तिचा खेळ मनोहर होतो. या कल्पना गुणाचा उत्कर्ष गोपाळरावांत नव्हता. तथापि प्रत्येक मनुष्यमात्राला अंशमात्रानें सर्वच गुण थोडेफार वांटणीला आलेले असतात. आपल्या वांटणीला आलेल्या भावना उद्दाम होऊ न देतां गोपाळरावांनी त्यांना कार्यवश ठेवल्या म्हणून त्यांची नेमस्त अशी ख्याति झाली. राजकारणी पुरुषांना हा नेमस्तपणाचा समर्थांनी स्तविलेला गुण फार उपयोगी पडतो. या गुणाचें उच्च स्वरूप म्हणजे चतुरपणा व मुत्सद्दीपणा आणि याचें अधम स्वरूप म्हणजे नेभळटपणा व दीनपणा होय. गोपाळरावांनी नेमस्तपणाचे उच्च स्वरूप जगापुढे प्रकट केलें आणि यांत जरी एखाद्या काव्हूरशीं त्यांची बरोबरी कल्पिणे ही अतिशयोक्तीच ठरेल तरी एखाद्या बर्कच्या जोडीला त्यांस ठेवण्यास चिंता नाहीं.
 (३) श्रद्धा- श्रद्धा हा त्यांचा तिसरा गुण वर्णन करतां येईल. रानड्यांचे ठिकाणी श्रद्धा बळकट होती. आणि 'हॅपी आर दे' या बहुपठित उद्गारांत त्यांनी ज्या प्रॉमिस्डलँड ग्हणजे भावी स्वर्ग-संबंधींचा आशावाद प्रदर्शित केला आहे त्यांचाच अनुवाद गोखले यांनी काशी- काँग्रेसचे अध्यक्षपीठावरूनहि केला. यावरून श्रद्धेचें हें वारे गोपाळरावांनाही लागलेलें होतें. वयाच्या उत्तर काळांत गोपाळरावांच्या मनांत हा श्रद्धाळूपणा वाढत गेला असे चरित्रकारांनी सुचविले आहे. हें श्रद्धाबळ हेहि सर्व थोर पुरुषांच्या ठिकाणी वसत असलेले आढळून येते "योयच्छ्रद्धः स एव सः" हा भगवद्गीतेचा सिद्धान्त सत्य आहे आणि मनाला श्रद्धेनें कांही थोर वेड लावून जीवेंभावें झटल्याखेरीज महत्कार्य कधीच होत