Jump to content

पान:ना. गोखले चरित्र.pdf/१५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१२५
गोखल्यांची या खेपेची विलायतेतील कामगिरी.

गोखल्यांनीं कबूल केलें कीं, मी हिंदुस्तानांतील माझ्या मित्रांस लिहितों कीं, शांतता राखा. ही कामगिरी करीत असतांना गोपाळराव इतर कामेही करीत होते, त्यांच्या खटपटीने आणि वजनानें सभाबंदीचा कायदा रद्द करण्यांत आला; राष्ट्रीय गीतें आणि मिरवणुकी यांस येणारे अडथळे नाहींसे झाले. शाळांतून हांकलून दिलेल्या मुलांना पुनः शाळेत जाण्यास परवाना मिळाला.
 अशा प्रकारें मोर्ले साहेबांजवळ खलबतें व मुलाखती चालू असतां अन्य द्वारे देशसेवा करण्याचे आपले कर्तव्य स्वसुखनिरभिलाषी गोखले करीतच होते. लंडनमध्ये 'ईस्ट इंडिया असोसिएशन' म्हणून एक संस्था आहे. मिस मॅनिंग या सन्मान्य स्त्रीच्या देखरेखीखाली या संस्थेची वार्षिक सभा 'इम्पीरियल इन्स्टिट्यूट' मध्ये भरली होती. या सभेपुढे गोपाळरावांनी 'Self Government' स्वराज्य या विषयावर एक निबंध वाचला. हा निबंध फार उत्कृष्ट आहे. त्यांत ब्रिटिश राजसत्ता हिंदुस्तानांत आल्यापासून तिचें थोडक्यांत पर्यालोचन केलें आहे. नंतर निरनिराळ्या वेळी दिलेली वचनें, व जाहीरनामे यांची आठवण देऊन- 'Good Government could never be a substitute for Government by the people themselves,' हे इंग्लंडच्या प्रधानाचें महत्त्वाचे वाक्य त्यांस सांगितलें आहे. हिंदुस्तानांतील सर्व बड्या जागा गोऱ्यांनीं अडविल्या आहेत, जास्त आडवू पहात आहेत आणि तरुण, सुशिक्षित व लायक माणसांस चांगल्या जागा मिळत नाहीत; उद्योगधंदे बुडत चालले; दारिद्र्य वाढत चाललें; शिक्षणाच्या नांवानें तर आंवळ्यायेवढें पूज्य; असा सर्वत्र नन्नाचा पाढा हिंदुस्तानांत ऐकू येत होता. असें कां व्हावें? जपाननें आपली सर्वतोपरी भरभराट पांचपन्नास वर्षोत करून दाखविली आणि जगास थक्क केलें. हिंदुस्तानामध्यें हें निदान सुघारलेल्या राज्यकर्त्यांच्या शंभर वर्षांच्या कारकिर्दीत तरी झाले पाहिजे होतें, परंतु झालें नाहीं आणि आणखी शंभर वर्षे जरी गेली तरी होईल असें दिसत नाहीं. लोक सुशिक्षित होऊं द्यात मग आम्ही त्यांस जास्त जास्त शिक्षण मिळालें म्हणजे राज्यकारभारांतही घेऊ. परंतु हें शिक्षण मिळणार कधीं? आणि तें जर कधींच मिळणार नसेल तर राज्यकारभारांतही भाग कधींच मिळणार नाहीं हें उघड आहे. गोपाळराव म्हणाले,