Jump to content

पान:ना. गोखले चरित्र.pdf/१५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१२६
कलकत्त्याची काँग्रेस.

-आम्हांस कांहीं एकदम आजच स्वराज्य नको. परंतु आज कांहीं तरी जास्त हक्क दिल्याखेरीज गत्यंतर नाहीं. हे हक्क म्हणजे गव्हर्नर जनरलच्या कौन्सिलांत, एक्झिक्यूटिव्ह कौन्सिलमध्ये आणि स्टेटसेक्रेटरीच्याही कौन्सिलांत भरपूर सुधारणा करणें. त्याप्रमाणेंच जिल्हाधिकाऱ्यांस मदत व सल्ला देण्यास प्रांतानिहाय व जिल्हानिहाय बोर्डे असावीं. प्रथम दोन तीन वर्षे हीं केवळ सल्ला देणारी असावीं. परंतु पुढे त्या बोर्डांचा जिल्हाधिकाऱ्यांवर दाबही असावा. अशा प्रकारच्या सुधारणा अत्यंत जरुरीच्या म्हणून गोपाळरावांनी सुचविल्या. यानंतर थोड्या दिवसांनीं गोखले हिंदुस्तानांत परत आले.
 डिसेंबरमध्ये १९०६ ची अत्यंत संस्मरणीय काँग्रेस कलकत्त्यास भरावयाची होती. या वर्षी नवीन राष्ट्रीय पक्षाचे प्रणेते टिळक हेच अध्यक्ष व्हावयाला पाहिजे होते. टिळकांनी बनारसच्या काँग्रेसच्या वेळींच बहिष्कारावर निराळा ठराव व्हावा असा हट्ट धरला होता, आणि हा बहिष्कार सर्वप्रांतीय व्हावा असे त्यांचे रास्त म्हणणे होते. याच गोष्टीने बंगालला खरी सहानुभूति दाखवितां येणें शक्य होते. परंतु त्यावेळीं बहिष्काराचा निराळा ठराव पास झाला नाहीं. काँग्रेसमध्ये बहिष्कार या शब्दाला मान्यता मिळाली, आणि गोखल्यांना अध्यक्षस्थानावरून त्या शब्दास संमति दिली यावरच टिळक यांनीं त्या वेळेस संतोष मानिला. पुढच्या वर्षी आणखी पुढे जाऊं अशी त्यांनीं मनीं गांठ बांधून ठेविली. टिळकच अध्यक्ष पाहिजेत असा पालबाबूंनीं धौशा आरंभिला. मुंबईच्या फेरोजशहांस हें पसंत नव्हतें. आतां राष्ट्रीय सभेवर मोठी आपत्ति कोसळणार असें त्यांस वाटू लागलें. टिळकांस अध्यक्ष होऊं देतां कामा नये यासाठीं त्यांनीं निराळाच व्यूह रचला. मुंबईच्या सिंहाला बंगालच्या सुरेंद्राने सहाय्य देण्याचे ठरविलें. अँग्लोइंडियन पत्रेंही प्रागतिकांना गोंजारू लागली. या जहाल मंडळींना जर काँग्रेस अनुकूल झाली तर राष्ट्राचे तारूं भडकेल आणि त्याला नीट तारून नेणें अशक्य होईल अशी त्यांनी हाकाटी सुरू केली. याच पत्रांनी १९०५ मध्ये गोखल्यांसारख्यांसही गालिप्रदान करण्यास मागें पुढें पाहिलें नाहीं, कारण त्यांनीं बहिष्कार न्याय्य ठरविला होता. परंतु आतां राष्ट्रीय पक्ष प्रबळ