Jump to content

पान:ना. गोखले चरित्र.pdf/१४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१०८
पुनः इंग्लंडला प्रयाण.

झाले!! नवचैतन्याचा उदय झाला!!! सर्व देशांतील लोकांची मनें एकवटलीं हा कर्झन साहेबांनी आमच्या राष्ट्रावर एक गुप्त उपकारच केला.
 १९०४ मध्ये ठरल्याप्रमाणें प्रत्येक प्रांतानें आपआपले प्रतिनिधि चळवळीसाठी इंग्लंडांत पाठवावयाचे ठरलें होतें. कर्झन साहेबांच्या दुष्ट कृत्यांची व त्या कृत्यांचा कळस जो फाळणीचा कायदा त्याची विलायतेतील लोकांस नीट कल्पना देण्यासाठीं शिष्टमंडळ पाठविणें अधिकच जरूर झालें. ब्रिटिश मालावर बहिष्कार का घालण्यांत येत आहे, त्यांत सुडाची भावना नसून इंग्लंडला जागे करण्याचा हा एक उपाय आहे हें विलायतेंतील जनतेस- मजुरांच्या समुदायांस पटवून देणें अगत्याचें होतें. ३ मे, १९०५ रोजी मुंबईस जाहीर सभा भरून मुंबई इलाख्यातर्फे गोखल्यांस विलायतेस पाठविण्याचे ठरले. तेव्हां गोपाळराव हिंदुस्तानांतील काम बाजूस ठेवून विलायतेस चालले. विलायतेस त्यांच्याविरुद्ध उठलेलें काहूर आतां शमलें होतें. प्रत्यक्ष गव्हर्नर जनरलनें त्यांस गतवर्षी सी. आय. ई. ही बहुमानाची पदवी स्वदस्तुरचें पत्र लिहून दिली होती. तेव्हां त्यांच्या सद्धेतूविषयीं त्यांच्या प्रामाणिकपणाविषयीं व सत्य स्पष्टोक्तीविषयीं विलायतेंतील लोकांस अंदेशा बाळगिण्याचे कारण नव्हतें. आपणास विलायतेंत समाधानकारक व जबाबदारपणें काम करितां यावें याच एका हेतूनें गोखल्यांनी ही पदवी स्वीकारली होती. कौन्सिलांतील सर्व श्रेष्ठ असा लोकप्रतिनिधि विलायतेस जात होता. ज्याच्या सणसणीत परंतु रास्त टीकेनें कर्झनसाहेबांस संताप न येतां प्रसन्न केलें, असा नेमस्त परंतु योग्य ती खरडपट्टी काढण्यास न भिणारा लोकनायक आतां इंग्लंडला जात होता. त्यांच्या शब्दाला इंग्लंडांत मान मिळेल; त्यांचें तेथें वजन पडेल अशी आतां सर्वांची व स्वतः गोखल्यांचीही खात्री होती. आणि म्हणूनच ते आपल्या दुःखी देशाची दीन कहाणी विलायतेंतील निरनिराळ्या लोकांस ऐकविण्याकरितां निघून गेले.
 इंग्लंडांत गोखले गेले ते मोठ्या योग्य वेळीं गेले. इंग्लंडमध्यें नवीन निवडणुकी व्हावयाच्या होत्या. जुनें मंत्रिमंडळ जाऊन नवीन उदार-मताचें मंत्रिमंडळ अधिकारारूढ होणार होतें. बाल्फोर साहेबांच्या प्रतिगामी मंत्रिमंडळाची फार नाचक्की झाली होती. नवीन निवडणुकीनें