Jump to content

पान:ना. गोखले चरित्र.pdf/१२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८९
कर्झन साहेबांचें कोरियांतील सत्यवादित्व !

कर्तव्य असे. गोखल्यांनीं आंकडे देऊन सिद्ध केलें कीं, १३७० (एक हजार रुपयांपेक्षां जास्त पगाराच्या) जागांपैकी फक्त ९२ एतद्देशीय लोकांस देण्यांत आलेल्या आहेत. हा निःपक्षपातपणाचाच प्रकार आहे काय? तरी आमचे कर्झनसाहेब सांगतात 'छेः छेः आमच्या येथें पक्षपात नाहीं. सर्वांस सारखें वागविण्यांत येते. हिंदु लोकांस भरपूर जागा देण्यांत येतात; देण्यांत येत नाहींत असें म्हणणें खोडसाळपणाचें आहे. असे हृदयभेदक प्रकार पाहिले म्हणजे संताप येतो. परंतु सत्तेपुढे शहाणपणा नाहीं. आंकड्यांशी काय करावयाचें? मी सांगतों आहें ना की भरपूर जागा देण्यांत येतात म्हणून? हिंदु लोकांस खरेपणा माहीत आहे कोठें? माझें वाक्य ब्रह्मवाक्य आहे आणि इतर लोक जरी सत्य सत्य असें सांगत असले तरी ती माया आहे! हिंदु लोक म्हणजे खोटे बोलणारे असा एक शेरा त्यांनी दिलाच आहे. परंतु अमृत बझार पत्रिकेने वेळींच कोरियांतील आठवण देऊन त्यांचे दांत त्यांच्याच घशांत घातले हें बरें झालें, गोखल्यांचीं हीं अंदाजपत्रकावरील भाषणे लांब लांब असत. कारण ते म्हणतात "This is the only day in the year when the non-official members of the council find an opportunity to place before Government their views, such as they may be in regard to the more important questions connected with the administration of India." सरकारपुढे राज्यकारभारासंबंधी आपले जे विचार असतील ते मांडण्यास हीच एक वेळ असते यामुळे जेवढे सांगावयाचें असेल तें सर्व या वेळेस गोखले सांगून टाकीत. दरवर्षी सरकारचे तेच तेच दोष न कंटाळतां ते पुनः पुनः दाखवीत. सर्व चुकांचा पाढा पुनः वाचीत. आपण जेव्हां कानीं कपाळीं ओरडूं तेव्हां हैदोस घालणाऱ्या सरकारचे आपल्या म्हणण्याकडे अल्प स्वल्प तरी लक्ष जाईल हें गोखल्यांस पूर्णपणे समजलें होतें. यामुळे ते आपल्या कर्तव्यनिष्ठेत क्षणभरही कसूर करीत नसत. 'शिल्लक पडत चालली, कर कमी करा, लोकांस जास्त जागा द्या, शिक्षणाकडे जास्त खर्च करा, लष्कर कमी करा, शेतकऱ्यांची स्थिति सुधारा हीं सुत्रें मांडून त्यांच्यावर ते नीट व्यवस्थित भाष्य करावयाचे.