Jump to content

पान:ना. गोखले चरित्र.pdf/१२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८८
साम्राज्यांतील अपमानाबद्दल साम्राज्याचा अभिमान बाळगा !

पाहिजेत, लोकांस जास्त मोठ्या पगाराच्या जागा देण्यांत आल्या पाहिजेत' शिक्षणाकडे कानाडोळा करूं नये, सरकारने सैन्य कमी करावें आणि जे राहील त्या सैन्याच्या खर्चापैकीं बराचसा बोजा इंग्लंडने सोसावा. १८८५ मध्ये ३०००० सैन्य वाढविलें. कशास तर म्हणे रशियाचा बागुलबोवा आहे म्हणून! रशियाचा बागुलबोवा दूरच राहिला परंतु या आधींच भिऊन गेलेल्या सरकारनें जें नवीन लष्कर ठेवलें त्याचा खर्च चालावा म्हणून मात्र कर वाढविण्यांत येतात! आणि रशियन पिशाच्चाची भीति नाहींशी झाली तरी हिंदुस्तानच्या रयतेच्या छाताडावर नंगा नाच घालणारें हें करांचें भूत- याला मात्र मूठमाती देण्यांत येत नाहीं! केवढी लोककल्याणाची तयारी! यासाठीच आह्मी या सरकारचें ऋणी असावयाचें काय? लोकांनी पोटास चिमोटा घेऊन दिलेले कर लष्करच्या लाडक्या लोकांच्या सुखसोयींसाठी खर्च व्हावे ना? कर्झनसाहेब मोठा उपदेशाचा आव आगून धीरगंभीर वाणीनें सांगतात, 'हिंदुस्तानानें संकुचित राष्ट्राभिमानाची दृष्टि अतःपर टाकून व्यापक साम्राज्याभिमानाची दृष्टि ठेवावी.' हे शब्द बोलतांना कर्झन शुद्धीवर होते कीं नाहीं कोण जाणे? किंवा हिंदुस्तानी लोकांस आपण गव्हर्नर जनरल असल्यामुळे सांगूं तें रुचेल व पटेल असे तरी त्यांस वाटलें असावें. हिंदुस्तानानें साम्राज्याभिमान कशासाठीं बाळगावयाचा? आफ्रिकेंत, कानडांत, आस्ट्रेलियांत सर्वत्र वसाहतींमध्ये हिंदु लोकांच्या होणाऱ्या अनंत यातनांसाठीं तर नव्हे? एतद्देशीय लोक म्हणजे पशुच असें समजण्याची उदारता हें वसाहतवाले दाखवतात म्हणून कीं काय? परंतु लांब कशाला, प्रत्यक्ष हिंदुस्तानांत लोकांच्या डोक्यावर सदैव दंडुका उगारलेला असतो, तेव्हां या परम भाग्यासाठीच आम्हीं साम्राज्याभिमान बाळगावयाचा ना? हिंदुस्तानास दूर अस्पृश्याप्रमाणे वागवीत असतां साम्राज्याचा अभिमान धरण्यास सांगणें म्हणजे दुःखावर डागण्या देणें आहे, जखमेवर मीठ चोळणे आहे. हिंदु लोकांस मन नाहीं, बुद्धि नाहीं, विचार नाहीं, भावना नाहीं, असेंच या कर्झनसाहेबांस वाटले असावें. लोकांच्या डोळ्यांत धूळ फेकणे, पांडित्याचें प्रदर्शन करणें, आपण तुमच्यापेक्षां किती वर आहों, किती अप्राप्य आहों हें दाखविणें कर्झनसाहेबांचे पवित्र