Jump to content

पान:ना. गोखले चरित्र.pdf/११७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८५
गोखल्यांची मनःस्थिति.

लाटांवर, समुद्रांच्या वक्षःस्थलावर मोठ्या डौलानें डुलत असते. आपल्या कामगिरीत यश मिळणार कां अपयश पदरी पडणार या विचाराने त्यांचे मन खालींवर होत होते. परंतु आशानिराशा बाजूस ठेवून यश मिळो वा अपयश येवो; आपलें पवित्र कर्तव्य म्हणून मी जात आहे असे त्यांनी सांगितलें, आणि या जबाबदारीच्या कामांतून या दिव्यांतून ते यशस्वीपणानें अलौकिक यशाने बाहेर पडले. कौन्सिलमध्यें काम करावयाचें, लोकांमध्ये राजकीय चळवळ चालू करावयाची हें काम अत्यंत त्रासाचें आणि जिकिरीचें असतें. लोकांत तर मतामतांचा गलबला माजलेला; धर्माप्रमाणे समाजांतही नाना पंथ बोकाळलेले आणि एकमेकांवर टीका करण्यास अस्तन्या सारून सरसावलेले. 'जो तो बुद्धिच सांगतो', अशी जेथें स्थिति आहे तेथे आपले म्हणणे कितपत ऐकूं जाईल; जेथें सरकारी अधिकारीही कठोर आणि अधिकाराने मगरूर आणि फार शहाणे, तेथे आपण कसे वागले पाहिजे याची गोखल्यांस फार चिंता वाटत होती. परंतु आतां आपल्या मनांतील कार्यास वाहून घेतांना कोणाच्याही टीकेस भीक न घालण्याचे त्यांनी ठरविलें. टीकांचा पाऊस कोसळला, निंदांचा कडकडाट झाला तरी आपले कार्य बरें कीं आपण बरे असे त्यांनी मनांत पक्के ठसविलें. कशाचीही क्षिति न बाळगितां, जो मार्ग आपणांस हितप्रद, व कल्याणकर असा दिसतो आहे, जो आपल्या पूज्य व दूरदृष्टि गुरूनें चोखाळला आणि आपणास व जो पाहील त्यास दाखविला, त्या मार्गानं सदसद्विवेक बुद्धीस अनुसरून, लोभालोभ दूर ठेवून जाण्याचें आणि लोकांस नेण्याचें त्यांनी ठरविलें. स्वतःच्या ध्येयावर एकान्तिक निष्ठा ठेवून, कधीं उल्लसित मनानें तर कधीं पोळलेल्या मनानें, आपले काम १९०२ पासून मरेपर्यंत या थोर पुरुषानें केलें. तो इतिहास फार हृदयंगम- कधीं उद्विग्न करणारा तर कधीं थरारून सोडणारा असा आहे. त्या इतिहासाकडे आतां आपण वळलें पाहिजे, येथें जातां जातां एक गोष्ट सांगावयाची ती ही की, गोखले हे आतां आजपर्यंतच्या आपल्या चळवळींचं स्थान जें पुणें तें सोडून मुंबईस कायमचे रहाण्यास जाणार होते. मेथा वगैरेंचाही आग्रह होता. परंतु पुण्याच्या मित्रांची फार गळ पडली, आणि त्यांस पुणे म्युनिसिपालिटीचे